इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन,नवी दिल्ली यांनी जाहीर केला पुरस्कार..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकला इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली (ISTE) यांच्या तर्फे महाराष्ट्र व गोवा विभागातून ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ हा बहुमान जाहीर करण्यात आलेला आहे. आयएसटीईच्या 4 मार्च रोजी नागपूर येथे होणाऱ्या वार्षिक अधिवेशनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली (ISTE) ही अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात काम करणारी राष्ट्रीय संस्था असून देशाची सर्वोच्च तंत्रशिक्षण संस्था अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेसोबत (AICTE) सोबत काम करते. संपूर्ण देशात चार हजार पेक्षा जास्त अभियांत्रिकी तंत्रनिकेतन/महाविद्यालये ही आयएसटीईचे सभासद आहेत.

संस्थेतर्फे दरवर्षी राष्ट्रीय तसेच विभाग स्तरावर विविध पुरस्कार जाहीर करण्यात येतात. यापैकीच एक म्हणजेच महाराष्ट्र व गोवा विभागातील सर्वोत्तम तंत्रनिकेतन अर्थात ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ हा पुरस्कार सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकला जाहीर करण्यात आला आहे.

2014 साली स्थापन झालेल्या या पॉलिटेक्निकला यापूर्वी 2019 मध्ये आयएसटीईचा ‘बेस्ट इमर्जिंग पॉलिटेक्निक’ हा पुरस्कार प्राप्त झालेला होता. याच कामगिरीत सातत्य राखत संस्थेने स्थापनेपासून केवळ आठ वर्षात ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ हा बहुमान प्राप्त करत इतिहास रचला आहे.

भोसले पॉलिटेक्निकने गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्हयूद्वारे नोकऱ्या मिळवून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. कॉलेजने 2019 मध्ये पहिल्यांदा एनबीए मानांकन प्राप्त केले होते व तीच गुणवत्ता कायम राखत 2022 मधील एनबीए पुनर्मूल्यांकनातही यश संपादन केले. एनबीए मानांकनाचा बहुमान प्राप्त करणारी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही एकमेव तंत्रनिकेतन संस्था असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे.

कॉलेजला मिळालेला हा बहुमान म्हणजेच विद्यार्थी, शिक्षक, पालक व संचालक मंडळ यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ असल्याचे मत याप्रसंगी प्राचार्य गजानन भोसले यांनी व्यक्त केले. कॉलेजने अल्पावधीत केलेल्या प्रगतीबद्दल व मिळवलेल्या बहुमानाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई व प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक यांनी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page