✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.
आसोली येथे भर वस्तीत बिबट्याचा पाडसावर हल्ला, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.आसोली – फणसखोल येथे भर वस्तीत बिबट्याचा वावर वाढला असून काल एका पाडसावर त्याने हल्ला चढविला. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मात्र तेथीलच रहिवासी घनश्याम गावडे यांनी प्रसंगावधान दाखवत आरडा-ओरड केल्यामुळे त्या बिबट्याने पळ काढला. या हल्ल्यात शेतकरी प्रमोद गावडे यांच्या मालकीचे दोन वर्षाचे पाडस जखमी झाले आहे. दरम्यान भरवस्तीत बिबट्या शिरत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून त्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, • अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सदस्य राकेश धुरी यांनी वन विभागाकडे केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, काल मध्यरात्रीच्या सुमारास संबंधित
बिबट्या वस्तीत शिरला. यावेळी गावडे यांच्या घरालगत असलेल्या गोठ्यात त्याने प्रवेश करून एका पाडसावर हल्ला चढविला. यावेळी ते पाडस ओरडू लागल्यामुळे तसेच आजूबाजूच्या कुत्र्यांची भुंक ऐकून लगतच राहणारे घनश्याम गावडे हे घरातून बाहेर आले. यावेळी संबंधित बिबट्या त्यांच्या दृष्टीस पडला. दरम्यान त्यांनी प्रसंगावधान राखून आरडाओरड केल्यामुळे त्या बिबट्याने पाडसाला सोडून धूम ठोकली. त्यामुळे त्या पाडसाचा जीव वाचला. मात्र त्याला बिबट्याने चावा घेतल्यामुळे तसेच नखांनी वार केल्यामुळे दुखापत झाली आहे. तरी संबंधित शेतकऱ्याला त्या पाडसाच्या उपचारासाठी आवश्यक ती नुकसान भरपाई वनविभागाने द्यावी, तसेच बिबट्याचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी श्री. धुरी यांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने केली आहे.