मालवण /-
सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसाईकांच्या
समस्या सरकार दरबारी मांडून त्या सोडवण्यासाठी निश्चितच आम्ही प्रयत्नशील आहोत. मालवणसह जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाईकांची नोंद करून डाटा एकत्रीकरण करण्याचे काम सुरू आहे. लवकरच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन पर्यटन व्यवसाईकांच्या समस्या, मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या जातील. अशी ग्वाही जिप सदस्य तथा मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली.
आज जागतिक पर्यटन दिन आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे पर्यटन व्यवसाय ठप्प आहे. मात्र पर्यटन व्यवसाईकाना दिलासा देण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्नशील राहू. असेही खोबरेकर यांनी सांगितले.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात खोबरेकर म्हणाले, गेली काही वर्षे नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या मच्छिमार बांधवाना न्याय देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मत्स्य पॅकेज जाहीर गेले. यासाठी आमदार वैभव नाईक, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांनी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.
त्याच धर्तीवर पर्यटन व्यवसाईकाना न्याय देण्यासाठी आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्या माध्यमातून सरकार दरबारी पाठपुरावा केला जाईल. गेल्या वर्षी समुद्री वादळांमुळे पर्यटन ठप्प झाले. यावर्षी कोरोना मुळे सहा महीने सर्व ठप्प झाले. आता हॉटेल सुरू झाली मात्र कोरोना संक्रमण सुरूच असल्याने पर्यटक अजूनही यायला तयार नाहीत. अजून किती दिवस हे असेच चालू राहणार माहीत नाही. या सर्व बाबींची माहिती पर्यटन मंत्र्यांना दिली जाईल. पर्यटन व्यवसाईकाना दिलासा देण्यासाठी निश्चितच आम्ही प्रयत्नशील असल्याचे श्री.खोबरेकर यांनी स्पष्ट केले.
डाटा एकत्रिकारणाचे काम सुरू
जिल्ह्यात अनेक तरुणांनी, अनेक कुटुंबांनी पर्यटन हाच प्रमुख व्यवसाय मानून मोठी गुंतवणूक करत व्यवसाय उभे केले. मात्र सगळेच ठप्प झाल्याने व्यवसाईक पूर्ण अडचणीत आहेत. तरी मालवणसह जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाईकांचा डाटा एकत्रीकरण करण्याचा काम सुरू आहे. लवकरच याबाबत कार्यवाही पूर्ण करून पर्यटन व्यवसाईकांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन आमदार, खासदार, पालकमंत्री यांची भेट घेतली जाईल. त्यानंतर पर्यटन मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येईल. असे खोबरेकर यांनी स्पष्ट केले.