हेल्पिंग हँडस वेल्फेअर सोसायटीच्या वतीने महाराष्ट्रातील ९ संस्थांना पुरस्काराने करण्यात आले सन्मानित
✍🏼लोकसंवाद /- कणकवली.
हेल्पिंग हँडस वेल्फेअर सोसायटी डोंबिवली च्या वतीने कणकवली येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अद्वैत फाऊंडेशन चा महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते नवरत्न पुरस्कार 2023 ने 5 फेब्रुवारी रोजी सन्मान करण्यात आला.डोंबिवली येथील स्वयंवर सभागृहात शानदार सोहळ्यात हावरे बिल्डर्स च्या चेअरमन उज्वला हावरे, झी 24 तास वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदीका अनुपमा खानविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र , शाल, श्रीफळ पुरस्कारस्वरूप प्रदान करण्यात आले. अद्वैत फाऊंडेशन च्या अध्यक्षा सरिता पवार, सचिव राजन चव्हाण, नितांत चव्हाण, मैत्रेयी चव्हाण यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी हेल्पिंग हॅन्ड वेल्फेअर सोसायटी च्या अध्यक्षा डॉ. प्रियांका कांबळे, सचिव गौरी पाटील, माजी अध्यक्ष समीर चव्हाण आदी उपस्थित होते.हेल्पिंग हँडस वेल्फेअर सोसायटी च्या वतीने सामाजिक , महिला सक्षमीकरण, शैक्षणिक, संविधान जनजागृती आदी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील संस्थाना नवरत्न पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या या पूरस्कारासाठी महाराष्ट्रातील 75 संस्थांमधून 9 संस्था आणि 3 वैयक्तिक कार्यकर्त्यांची नवरत्न 2023 पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. अद्वैत फाऊंडेशन च्या वतीने मागील 6 वर्षे बाल आणि युवा पिढीच्या मनात मानवता हाच धर्म ही शिकवण रुजवण्यासाठी राष्ट्र सेवा दल चे व्यक्तिमत्व, संस्कार शिबीर राबविले जात आहे.तसेच अद्वैत फाऊंडेशन च्या माध्यमातून शाळा, महाविद्यालय, तरुणाई च्या शिबिरांतून सरिता पवार तसेच महाराष्ट्रातील अभ्यासू वक्त्यांची भारतीय संविधान तसेच सामाजिक विषयांवर व्याख्याने दिली जातात. पूरस्थितीत सांगली ,कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील आपद्गग्रस्तांना लाखो रुपयांची वस्तू तसेच रोख रक्कम स्वरूपात मदत समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून तसेच पदरमोड करून केली , गेली अनेक वर्षे गरजू गरीब होतकरू 25 विद्यार्थ्यांना वर्षभर उपयोगात येणारे शैक्षणिक साहित्य चप्पल छत्र्या अवांतर वाचनासाठी पुस्तके मोफत दिली जातात. संस्थेच्या या कार्याची दखल घेत नवरत्न 2023 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.