✍🏼लोकसंवाद /- तुर्कस्थान.
तुर्कस्थान देश साखळी भूकंपांमुळे हादरला आहे. टर्कीसह सिरियामध्येही भूकंपाचे धक्के बसले आहे. या भूकंपांमधील मृतांचा आकडा ५ हजारावर पोहोचला आहे.प्राप्त माहितीनुसार मंगळवारी झालेल्या पाचव्या भूकंपाची तीव्रता ५.४ रिश्टर स्केल असून यामध्ये मोठी वित्तहानी झाली आहे. टर्कीमधील भूकंपग्रस्त भागात अजूनही हजारो लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मृत्यूच्या या तांडवात आशेचा किरण ठरलेला एक व्हिडीओ सध्या समोर येत आहे.
टर्कीमध्ये एका चिमुकलीला १२ तासांनंतर ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. गुडएबल या ट्विटर पेजने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बचाव कार्य दाखवण्यात आले आहे. आपण पाहू शकता की यात ढिगाऱ्याखालून बाहेर काढताना ती अल्पवयीन तरुणी अगदी स्तब्ध आहे. पूर्णपणे बाहेर काढल्यावर तिला फार गंभीर दुखापत न झाल्याचे सुद्धा लक्षात येते.या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून तुर्कीमधील नागरिकांसाठी प्रार्थना केली आहे. तसेच या मुलीचा जीव वाचणे हे खरेच आश्चर्यकारक व दैवी असल्याचेही काहीजण म्हणत आहेत. देव तारी त्याला कोण मारी असे म्हणतात त्याची ही प्रचिती आहे अशी भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर अजूनही हजारो लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. प्राप्त माहितीनुसार, पहिल्या भूकंपाचा केंद्रबिंदू सीरियाच्या सीमेवर असलेल्या गाझियानटेप प्रांतातील नुरदागीजवळ होता. त्यानंतर देशभरात अन्य ठिकाणी चार भूकंप झाले आहेत.