✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.
राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली खर्चासाठी प्रयोग अनुदान मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून शासन निर्णयाद्वारे समिती पुनर्गठित करण्यात आली आहे.यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचे श्री देवेंद्र नाईक आणि नाईक मोचेमाडचे तुषार नाईक यांची निवड या समितीच्या सदस्यपदी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील सर्व लोककला टिकून राहाव्यात व लोककलांची माहिती पुढील पिढीला व्हावी आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व पारंपारिक लोककलांचे जतन करण्यासाठी या लोककलांना उत्तेजन द्यावे या हेतूने त्यांच्या कलापथकांना भांडवली खर्चासाठी प्रयोगासाठी अनुदान देण्याच्या योजनेस शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली होती तसेच शासन निर्णयान्वये कलापथकांना भांडवली खर्चासाठी प्रयोग अनुदान मंजूर करण्यासाठी या कलापथकांच्या अर्जाची छाननी करणे व त्यांची नियमानुसार पात्रता तपासून निवड करण्यासाठी निवड समिती गठीत करण्याची तरतुद होती त्याअनुषंगाने राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली खर्चासाठी प्रयोग अनुदान मंजूर करण्यासाठी समिती पुनर्गठित करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीच्या अध्यक्षपदी असून सदस्यपदी दशावतार कला प्रकार साठी श्री तुषार नाईक मोचेमाडकर, श्री देवेंद्र नाईक,तमाशा कला प्रकारासाठी श्रीम मंगला बनसोडे, श्री अतांबर शिरढोणकर,खडीगंमत कला प्रकारासाठी शा.अलंकार टेंभूर्णे,शा.वसंता कुभांरे, लावणी कला प्रकारासाठी श्रीम छाया खुटेगांवकर,श्रीम रेश्मा मुसळे,शाहिरी कला प्रकारासाठी श्री अंबादास तावरे,श्री धनंजय खुडे यांची निवड करण्यात आली आहे तर सचिवपदी सांस्कृतिक कार्य संचालनालयचे सहसंचालक यांची नेमणूक करण्यात आली आहे.
सदर समिती शासन निर्णय दिनांकापासून पुढिल 3 वर्ष कालावधी साठी किंवा समितीची पुनर्रचना होणे यापैकी जे अगोदर घडेल तो पर्यंत कार्यरत राहणार आहे असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.