लोकसंवाद /- कुडाळ.
पारस काव्य, कला जनजागृती संस्था,सानपाडा-मुंबईच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय ‘निसर्गमित्र’ पुरस्काराने पावशी गावचे प्रगतशील कृषीमित्र प्रवीण ताम्हाणेकर यांना गौरविण्यात आले. हा पुरस्कार सोहळा सानपाडा (मुंबई) येथील डॉ. आंबेडकर भवन येथे पार पडला.यावेळी ज्येष्ठ कवी पुंडलिक म्हात्रे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चांदिवलेकर, उपाध्यक्ष शंकर बाईल, सचिव दामोदर बेडेकर, खजिनदार शोभा चांदिवलेकर आदी उपस्थित होते. शैक्षणिक, सामाजिक, साहित्य, पत्रकारिता, वैद्यकीय, क्रीडा,पर्यावरण, शेती, कृषिक्षेत्र व इतर क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना संस्थेकडून दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यावर्षी राज्यातील १० व्यक्तींना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ताम्हाणेकर यांनी कोकणात कुडाळ नवीन डेपो येथे सिद्धिविनायक नर्सरीच्या माध्यमातून कृषिक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना ‘निसर्गमित्र’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आतापर्यंत त्यांचा कृषीक्षेत्रातील हा चौथा पुरस्कार आहे. हे सर्व पुरस्कार त्यांनी मेहनत आणि अपार मेहनतीच्या जोरावर मिळविले आहेत. कृषिक्षेत्रात त्यांनी अनेकांना रोजगाराची संधी दिली आहे.