▪️बांदा /-
बांदा एसटी बस स्थानकात नव्याने बांधण्यात आलेले सुलभ शौचालय लवकरात लवकर प्रवाशांसाठी सेवेसाठी खुले करावे अशी मागणी बांदा ग्रामपंचायत सदस्या देवल येडवे यांनी एसटी आगाराच्या कनिष्ठ अभियंता गिरीजा पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सुलभ शौचालयाचे काम ९० टक्के काम झाले असुन जानेवारी महिनाअखेरीपर्यंत पुर्ण होणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून प्रवाशांच्या सेवेसाठी खुले करण्याचे आश्वासन कनिष्ठ अभियंता पाटील यांनी दिले आहे.
बांदा एसटी आगार हे जिल्ह्यातील महत्वाचे व महामार्गावरील शेवटचे बसस्थानक आहे.गोवा राज्यात जाणारे व या बसस्थानकात अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याही येत असतात. तसेच बांदा बाजारपेठेत व हायस्कूल काँलेजला जाणारे विद्यार्था तसेच ५० हुन गावातील नागरीक खरेदिसाठी ये जा करत असतात. याठिकाणी असणारे जुने शौचालय पूर्णपणे जीर्ण झाले होते.त्यामुळे या शौचालयाच्या नजीक नवीन शौचालय उभारण्यात येत आहे.त्याचे काम जवळपास ९० टक्के काम झाले आहे.हे शौचालय लवकर पूर्ण करून प्रवासी व नागरिकांना खुले करावे जेणेकरून मुख्यत्वे महिलांची होणारी गैरसोय दूर होईल.असे या निवेदनात सदस्य येडवे यांनी म्हटले आहे.यावेळी वाहतुक नियंत्रक प्रकाश नार्वेकर, उदय येडवे,ओंकार नाडकर्णी,विजेद्र बांदेकर आदी उपस्थित होते.