वॉशिंग्टन /-

आपण जर अमेरिकेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवडून आलो तर चीनवरचे अवलंबित्व आपण कायमचे संपवून टाकू, असा निर्धार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्‍त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, करोनाचा विषाणू चीनमधून आला होता हे आम्ही कदापिही विसरू शकत नाही.
न्यूपोर्ट व्हर्जिनिया येथील एका निवडणूक प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, चीनकडून आलेल्या विषाणूचा मोठा फटका अमेरिकेला बसला आहे. दोन लाख अमेरिकन नागरिकांचे प्राण या चिनी विषाणूने घेतले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसला असून लक्षावधी लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

तथापि, आम्ही हा प्रकार पुन्हा होऊ देणार नाही आणि आम्ही ही बाब कदापिही विसरणार नाही. आता आम्ही देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर आणत आहोत, असेही त्यांनी नमूद केले आहे.

चीनविषयी आपला भ्रमनिरास झाला असून आता अमेरिका आणि चीन यांचे संबंध पूर्वीसारखे राहण्याची शक्‍यता नाही, असेही त्यांनी नमूद केले. पूर्वी माझे चीनशी अधिक चांगले संबंध होते. आम्ही त्यांच्याशी मोठा व्यापार करारही केला होता. पण आता आमच्यात पूर्वीसारखे काहीही राहिलेले नाही. आम्हाला आता चीनवरचे अवलंबित्व कायमचे संपवायचे आहे, असे त्यांनी नमूद केले.चीन आमच्या शेतीमालाचा मोठा खरेदीदार आहे. त्यांच्याशी आम्ही जो व्यापार करार केला त्याची शाई वाळायच्या आत त्यांच्याकडून आलेल्या विषाणूने आपल्यावर फार मोठी आपत्ती आणली आहे. त्यांना हे थांबवणे शक्‍य होते पण चीनने ते केले नाही, असा दावाही ट्रम्प यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page