कुडाळ -काळसे मार्गावर अपघात,अपघातात डंपरसह महावितरणचे नुकसान..

मालवण /-

काळसे रस्त्यावर चौकेच्या दिशेने जाणाऱ्या जीए ०९ व्ही-९१२३ या भरधाव डंपरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने राममंदिर नजीक आजगावकर इको स्टोअरच्या समोरील रस्त्याकडेच्या विद्युत पोलला जोरदार धडक दिली. त्याचवेळी या डंपरच्या मागाहून येणाऱ्या जीए ०९ – यु- ५१२३ या डंपरचेही वेगावर नियंत्रण न राहिल्याने तो डंपर पोलला धडकलेल्या डंपरला मागून आपटला आणि याठिकाणी दुहेरी अपघात घडला. अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघातात विद्युत पोलचे चार तुकडे झाले आणि वीजवाहिन्या तुटून महावितरणचे नुकसान झाले आहे. दोन्ही डंपरच्या दर्शनी भागाचेही नुकसान झाले आहे. परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. हा अपघात आज सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान रस्त्यावर घडला.

महावितरण कर्मचारी आणि ठेकेदारांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेतले. चौके धामापूर कुडाळ मार्गावर कुठेही गतीरोधक नसल्यामुळे आणि भरधाव वाहनांच्या खास करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या तसेच इतर वाहनांच्या वेगावर वाहतूक विभागाचे नियंत्रण नसल्याने या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे अपघातामुळे कोणाचातरी बळी गेल्यानंतर पोलीस प्रशासन जागे को का असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page