कुडाळ /-
कुडाळ नगरपंचायत हद्दीतील नगर भूमापन क्रमांक 887, 888, 3159 मधील निवासी इमारत शुभम मधील फ्लॅटधारकांनी निवासी प्रयोजनासाठी फ्लॅट खरेदी केलेले असताना विकासक सिध्दिविनायक डेव्हलपर्स व नगरपंचायत यांचे संगनमताने फ्लॅट क्रमांक ००६ (नगरपंचायत घर क्रमांक ४१७५/५) मध्ये जेन्टस सलून व लेडिज पार्लर वापर तोही निवासी संकूलात बिनबोभाट सुरु झाल्याने महिला रहिवाशांना होणा-या त्रासाला कंटाळून रहिवाशांनी मा. मुख्याधिकारी नगरपंचायत कुडाळ, मा. जिल्हाधिकारी महोदय यांचेवतीने श्री. तावडेसाहेब, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका शाखा, कुडाळ वॉर्ड क्रमांक १२ च्या नगरसेविका सौ. संध्या तेरसे यांची समक्ष भेट घेऊन दिनांक १९/०५/२०२२ रोजी निवेदन दिलेले होते.
सदर निवेदनाचे अनुषंगाने प्रशासनाकडून कोणतीही दंडात्मक कारवाई न झाल्याने रहिवाशांनी नाईलाजास्ताव कायदेशीर मार्ग पत्करत विकासक सिध्दीविनायक डेव्हलपर्स करिता श्री. प्रकाश राजाराम जैतापकर, ‘नॅशनल सलून कम लेडिज पार्लर’ चे मालक सौ. दिपीका महादेव चव्हाण व श्री. महादेव बाळकृष्ण चव्हाण , मा. मुख्याधिकारी नगरपंचायत कुडाळ, मा. जिल्हा नगरविकास अधिकारी-नगरपालिका शाखा सिंधुदुर्गनगरी, मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवासी शुभम बिल्डींगमधील बेकायदेशीर सलूनकरिता सुरु असलेला वाणिज्य वापर बंद न केल्याने पुढील १५ दिवसांत सलून बंद करण्याबाबत कायदेशीर नोटीस सामाजिक – माहिती अधिकार -मानवी हक्क अधिकार कार्यकर्ते अॅड. उत्तम म. कदम, कुडाळ यांचेमार्फत दिली. विहित मुदतीत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यास सक्षम न्यायालयात दावा दाखल करणेत येणार आहे. ग्राहक म्हणून सदनिकाधारकांना प्राप्त होणारे हक्क व अधिकार मिळविणे व विकासकाकडून होणारी फसवणूक टाळणेकामी सक्षम न्यायालयात कायदेशीर लढा देण्याचा निर्धार शुभम संकुलातील रहिवाशांनी केला आहे.
रहिवाशांनी प्रसंगी पोटाला चिमटा देऊन लाखो रुपयांचे कर्ज काढून तर काहींही सेवानिवृत्तीनंतर मिळणारी सर्व पुंजी खर्चून सदनिका विकत घेतलेल्या आहेत. मुली आणि स्त्रियांना होणारा त्रास व उपद्रवाचा प्रतिबंद कारवाई होऊन विहित मुदतीत न झाल्यास सबंधित सलून चालक-मालक व त्यांचेशी संगनमत करून त्यांना अभय देणाऱ्यांविरुध्द रस्त्यावर येऊन तसेच सनदशीर मार्गाने लढा देण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नाही अशी माहिती रहिवाशांनी दिली.