वेंगुर्ले /-
वेंगुर्ले तालुक्यातील पेंडूर ग्रामपंचायतीचे सरपंच गितांजली गुंडू कांबळी यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३ कलम ३९(१) अन्वये पेंडूर ग्रामपंचायत सरपंच पदावरून तसेच ग्रामपंचायत सदस्य पदावरून काढून टाकण्यात आल्याचे कोकण विभागाचे विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी दि. २० जून २०२२ च्या आदेशाने जाहिर केले आहे.
वेंगुर्ले गटविकास अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत अधिनियम कलम ३८ व महाराष्ट्र ग्रामपंचायत तपासणी आणि कागदपत्रांची तपासणी त्यांचा शोध नियम १९६३ मधील ४(२) मधील तरतुदीचे उल्लंघन केल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास येत असल्याने त्यांच्या विरूध्द महाराष्ट्र कारवाई करण्याबाबत प्रस्ताव सिंधुदुर्ग जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविला होता.
वेंगुर्ले गटविकास अधिकारी यांच्या अहवालानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोकण विभागाचे विभागीय आयुक्त याना आपला अहवाल सादर केला. या अहवालांत, पेंडूर ग्रामपंचायतच्या दि. २५ जुलै २०१९ च्या मासिक सभेत सर्वानुमते ग्राम रोजगार सेवक यांचे मानधन देण्याबाबत मंजुरी देण्यात आलेली आहे. वेंगुर्ले पंचायत गटविकास अधिकारी यांच्या २३ मार्च २०२० रोजी या बाबत लेखी निर्देश दिलेले असताना व ग्रामसेवक यांनी १५ मे २०२० रोजी धनादेशावर सही केलेली असताना सुध्दा, सरपंच यांनी धनादेशावर सहि केलेली नाहि. त्यामुळे सरपंच यांनी नियमाचे उल्लंघन केलेले आहे. तसेच सरपंच यांनी संतोष धोंडू तांडेल यांना ग्रापंचायत नमुना नं.८ सन ६७-६८ चा इमारत क्रमांक ५१७ चा उतारा धोंडू लक्ष्मण तांडेल यांच्या नावावर असल्याचा दाखला स्वत:च्या सहीने दिलेला आहे. प्रत्यक्षात नमुना नं.८ सन १९६७-६८ मध्ये इमारत क्रमांक ५१७ चा मालक बाबू लक्ष्मण आसोलकर असे नाव नमुद आहे. याबाबत रितसर कार्यवाहि करणे आवश्यक असताना तशी सरपंच यांनी कार्यवाहि केलेली नाहि. त्यामुळे सरपंच यांनी कर्तव्यात कसुर केलेली आहे. या सिंधुदुर्ग जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या अहवालाशी सहमत असल्याचे आयुक्तांनी दिलेल्या निष्कर्षात नमुद केले आहे.त्यानुसार कोकण विभागाचे विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चा अधिनियम मुंबई अधिनियम क्र. ३ कलम ३९(१) नुसार त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारा नुसार पेंडूर ग्रामपंचायतीचे सरपंच गितांजली कांबळी याना पेंडूर ग्रामपंचायत सरपंच पदावरून तसेच ग्रामपंचायत सदस्य पदावरून काढून टाकण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
