मालवण /-
पर्यटन शहर असणाऱ्या मालवणच्या वाहतूक नियंत्रणात मोलाची कामगिरी बजावणारे आणि कोरोना काळात गेले सहा महिने कोरोना योद्धा बनून भरड नाका येथे रात्रंदिवस पहारा ठेवणारे मालवणचे वाहतूक पोलिस कर्मचारी श्री. चंद्रशेखर मुणगेकर यांची बांदा येथे बदली झाली.
मालवण वासीयांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणाऱ्या मुणगेकर यांच्या मालवणातील सेवेबद्दल मालवणच्या नागरिकांकडून त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
मालवण पोलीस स्थानकात वाहतूक पोलीस म्हणून चंद्रशेखर मुणगेकर हे गेली काही वर्षे कार्यरत होते. ट्रॅफिक पोलीस म्हणून त्यांनी मालवणात आपला दरारा निर्माण केला होता.
मालवणातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवणे तसेच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागृती निर्माण करणे, व नागरिकांना वाहतुकीबाबत शिस्त लावण्यासाठी मुणगेकर यांनी आपल्या सेवेतून मोलाचे योगदान दिले. त्यामुळे नागरिकांमध्ये मुणगेकर यांच्या विषयी आदरयुक्त भीती तसेच स्नेहही निर्माण झाला. तर कोरोना महामारी काळात गेले सहा महिने जीवाची पर्वा न करता भरड नाका येथे ड्युटी बजावत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर वचक ठेवण्यात व कोरोना विषयक नियमांची अंमलबजावणी करण्यातही मुणगेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने उत्तम कामगिरी बजावली. मात्र त्यांची बदली बांदा येथे झाली आहे. आपल्या सेवेमुळे मालवण वासीयांमध्ये लोकप्रिय पोलीस कर्मचारी म्हणून स्थान मिळवलेल्या मुणगेकर यांच्या कार्यप्रति नागरिकांकडून त्यांचा भरड नाका येथे सत्कार करण्यात आला. यामध्ये भरड तेथील सन्मित्र रिक्षाचालक मालक मंडळ, भरड नाक्यावरील व्यापारी व व्यावसायिक नागरिक, तसेच आदर्श रिक्षा स्टँड तारकर्ली रोड भरड आदी व इतरांच्या वतीने मुणगेकर यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. मालवण वासीयांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मुणगेकर यांनी सर्वांचे आभार मानले.