सावंतवाडी /-

मडगाव-सीएसटी मांडवी एक्सप्रेसमध्ये आज चोरट्याला रंगेहाथ पकडण्यात आले. कोकण रेल्वेतील टिसी प्रविण लोके, मंगेश साळवी, मिलिंद राणे यांच्या सतर्कतेमुळे चोरट्याला पकडण्यात यश आले असून त्यांनी सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. यातील तक्रारदार जगदेव सिंग व सोहेल पठाण यांना त्यांची रोख रक्कम व बॅग सुपूर्द केली आहे.

याबाबत प्रवासी जगदेव सिंह व सोहेल पठाण यांनी तक्रार दाखल केली आहे. यात सिंह हे कोकण रेल्वे मार्गावरील मांडवी एक्स्प्रेस रेल्वेतून B1 AC या डब्यातून मडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई असा प्रवास करीत होते. यावेळी सावंतवाडी येथे आले असता त्यांची बॅग व मोबाईल नसल्याचे आढळून आले. या बॅगेत त्यांची ६ हजार रुपये रोख रक्कम व सामान होते. त्यांनी शोधाशोध केली असता त्यांना आपले साहित्य आढळून आले नाही. सिंग यांनी हा प्रकार कोकण रेल्वेतील टीसी प्रविण लोके, मंगेश साळवी व मिलिंद राणे यांना सांगितला. त्यांनीही रेल्वेमध्ये कोणी संशयित व्यक्तीची शोधाशोध केली. यावेळी ट्रेनमध्ये बॅग हातात घेऊन जात असलेली व्यक्ती त्यांना दिसली.

मुस्तफा असे त्या तरुणाचे नाव असून त्याची झाडाझडती घेतली असता तो चोरटा असल्याचे लक्षात आले. टीसी यांनी बॅगेसह तरुणाला ताब्यात घेत इतरही लपवून ठेवलेले ६ मोबाईल, ४ बॅग व ६ हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल शिताफीने जप्त केला. टीसी श्री. लोके, साळवी व राणे यांनी जगदेव सिंग यांच्याकडे त्यांचे चोरीला गेलेले साहित्य तात्काळ सुपूर्द केले. तसेच त्यानंतर सोहेल पठाण यांचीही हरवलेली बॅग त्यांनी सुपूर्त केली. इतर बॅग मालक व मोबाईल धारकांशी सम्पर्क केला जात असून लवकरच त्यांचे साहित्य त्यांना रत्नागिरी येथून दिले जाणार आहे… सिंग व पठाण यांनी दिलेल्या तक्रारीनंतर चोरट्याला रत्नागिरी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले असून अधिक तपास ते करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page