You are currently viewing ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कुडाळातील महिलेचा जामीन अर्ज फेटाळला..

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कुडाळातील महिलेचा जामीन अर्ज फेटाळला..

ओरोस /-

बनावट बासबुके तयार करून पोस्ट कार्यालय व ठेवीदारांची एक कोटी एक लाख ५९ हजारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या कुडाळ माठेवाडा येथील पूजा संदीप रुद्रे यांचा अटकपूर्व जमीन जिल्हा न्यायाधीश २ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश गौरी कवडीकर यांनी फेटाळून लावला आहे. याप्रकरणी जिल्हा सहाय्यक सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी सरकार पक्षाच्यावतीने काम पाहिले.

संशयित आरोपी पूजा रुद्रे या कुडाळ पोस्ट कार्यालयात अल्पबचत एजंट म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी १४ मार्च २०१५ ते २४ मे २०१९ या कालावधीत १०४ बनावट पासबुके बनवून ३६ ठेवीदारांचे एक कोटी एक लाख ५९ हजार रुपयांचा आर्थिक अपहार केला आहे. यामाध्यमातून पोस्ट कार्यालय व ठेवीदार यांची फसवणूक केल्याने पोस्ट कार्यालयाचे मालवण येथील ग्राहक निरीक्षक सचिन रामभाऊ पानढवळे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यानुसार पूजा रुद्रे यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात भादवी कलम ४०८, ४०९, ४२०, ४६५, ४६८, ४६६, ४७१ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पूजा रुद्रे यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. यावर सुनावणी पूर्ण झाली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने बाजू मांडताना संशयित पूजा रुद्रे यांनी बनावट बासबुके कोणाकडून करून घेतली आहेत. त्यांनी आर्थिक अपहार केल्याचे पोस्ट खात्याच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यांनी खोटी स्वाक्षरी मारली आहे. त्यामुळे या प्रकरणी पोस्ट खात्यातील आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याचा तपास करायचा असल्याने त्यांना अटकपूर्व जामीन देऊ नये, असा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायालयाने पूजा रुद्रे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा