मुंबई /-
“आयकर विभागाची नोटीस येणार असे मी ऐकले आहे. सोमवारी येणार होती असेही कळले होते. हातात आली नाही. देशातल्या एवढ्या लोकांमध्ये केवळ आमच्यावर विशेष प्रेम आहे ही आनंदाची बाब आहे,” या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आयकर विभागाच्या नोटीशीसंदर्भात मंगळवारी (22 सप्टेंबर) प्रतिक्रिया दिली.
पण अशी कोणतीही नोटीस पाठवण्याचे आदेश आम्ही आयकर विभागाला दिलेले नाहीत असे निवडणूक आयोगाने आता स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुळात स्वत: शरद पवारांनी माहिती दिल्याप्रमाणे अशी कोणती नोटीस त्यांच्यापर्यंत पोहचली आहे का? आणि निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन नोटीस पाठवली नाही मग आयकर विभागाने कशाच्या आधारावर ही कार्यवाही केली?
असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.2009 लोकसभा आणि 2014 आणि 2019 मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रासंदर्भात ही नोटीस आहे का हे देखील अद्याप स्पष्ट नाही.
लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था अशा सर्वच निवडणुकांपूर्वी उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. या प्रतिज्ञापत्रात संबंधित उमेदवाराची वैयक्तिक माहिती, संपत्ती, व्यवसाय, गुन्हेगारी पार्श्वभूमी अशी सर्व माहिती नमूद करावी लागते.
भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अशा प्रत्येक उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र उपलब्ध असते.
शरद पवारांची संपत्ती किती आहे?
2009 पासून शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार शरद पवार यांची एकूण संपत्ती किती आहे?
असोसिएशन फॉर डेमोक्रटिक रिफॉर्म्स (ADR) या निवडणुकीसंदर्भातल्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी मार्च 2020 मध्ये राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात –
शरद पवार यांची एकूण संपत्ती 32 कोटी 73 लाख 67 हजार 269 रुपये एवढी आहे. शरद पवारांची जंगम मालमत्ता 25 कोटी 21 लाख 33 हजार 329 रुपये आहे. तर स्थावर मालमत्ता 7 कोटी 52 लाख 33 हजार 941 रुपये आहे.
जंगम मालमत्तेत, 65,680 रुपये रोकड, 9 कोटी 39 लाख 93 हजार 386 रुपये बँकेत विविध स्वरुपात आहेत.7 कोटी 46 लाख 24 हजार 449 रुपयांचे बाँड्स आणि कंपनी शेअर आहेत.88 लाख 65 हजार 805 रुपयांचे दागिने असल्याचा उल्लेख आहे.7 कोटी 45 लाख 84 हजार रुपये एवढे वैयक्तिक कर्ज किंवा अॅडव्हॉन्स म्हणून दिलेली रक्कम आहे.
स्थावर मालमत्तेत, 1 कोटी 30 लाख 97 हजार 960 रुपयांच्या शेतजमिनींचा उल्लेख आहे.91 लाख 71 हजार 480 रुपयांची बिगरशेती जमीन आहे.3 कोटी 12 लाख 50 हजार रुपये मालकीची व्यावसायिक इमारत आहे. तर 2 कोटी 17 लाख 14 हजार 501 रुपये मालकीची रहिवासी इमारत आहे.
शरद पवारांवर 1 कोटी रुपयाचे देणे आहे. यातले 50 लाख रुपये शरद पवार यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि 50 लाख रुपये नातू पार्थ पवार यांच्या कडून घेतले आहेत.प्रतिज्ञापत्रात उल्लेख केल्याप्रमाणे, ही एकूण संपत्ती शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावे नमूद करण्यात आली आहे.शरद पवारांच्या नावावर एकही गाडी नसल्याची माहितीही प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.दहा वर्षांत संपत्तीत किती वाढ?2009 मध्ये शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यावेळी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या,प्रतिज्ञापत्रानुसार,असोसिएशन फॉर डेमोक्रटिक रिफॉर्म्स (ADR) या निवडणुकीसंदर्भातल्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार,त्यांची एकूण संपत्ती 8 कोटी 72 लाख 38 हजार 434 एवढी होती. यामध्ये 5 कोटी 15 लाख 24 हजार 248 रुपये जंगम मालमत्ता तर 3 कोटी 57 लाख 14 हजार 186 रुपये स्थावर मालमत्ता होती.
जंगम मालमत्तेत, शरद पवार, त्यांच्या पत्नी आणि एकत्र कुटुंबाचे मिळून 2 लाख 10 हजार रुपये रोकड,बँकेतील आणि इतर ठेवी, इ. मिळून शरद पवार, त्यांच्या पत्नी आणि एकत्र कुटुंब असे मिळून 1 कोटी 81 लाख 81 हजार 191 रुपये आहेत. तसेच एकूण 27 लाख 33 हजार 802 किमतीच्या दगिन्यांचा उल्लेख आहे.यामध्ये बाँड्स, शेअर्स आणि इतर क्लेम्स असे सगळे मिळून एकूण 5 कोटी 15 लाख 24 हजार 248 रुपये जंगम मालमत्ता दाखवण्यात आली आहे.
तर शेतजमीन, भूखंड, इमारत अशी एकूण 3 कोटी 57 लाख 14 हजार 186 रुपयांची स्थावर मालमत्ता दाखवण्यात आली आहे.गेल्या दहा वर्षांत शरद पवारांच्या संपत्तीत 24 कोटी 1 लाख 28 हजार 835 रुपयांनी वाढ झाली आहे.2014 च्या राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रासोबत तुलना केली तर गेल्या सहा वर्षांत शरद पवार यांची संपत्ती 60 लाख रुपयांनी वाढली आहे. 2014 च्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती 32.13 कोटी रुयये होती.