You are currently viewing आमदार नितेश राणेंचा सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.

आमदार नितेश राणेंचा सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.

आमदार नितेश राणेंना अटक करण्यासाठी पोलिसांनी आखली व्यूहरचना.

सिंधुदुर्ग /

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं भाजप आमदार नितेश राणे यांना जोरदार दणका दिला आहे. त्यांचा नियमित जामीन अर्ज सुद्धा नामंजूर केला आहे. आम्ही उच्च न्यायालयात जाणार असल्याचं नितेश राणेंनी सांगितलं आहे. पण, त्यापूर्वी त्यांना पोलिस अटक करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नितेश राणे यांची गाडी पोलिसांनी अडवली आहे. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते जात असताना पोलिसांनी त्यांच्यासमोर आपल्या गाड्या लावल्या आहेत. यामुळे माजी खासदार निलेश राणे आक्रमक झाले आहेत. थांबविण्याचे आदेश दाखवा, अशी त्यांनी मागणी केली आहे. भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. कुठल्या अधिकाराखाली थांबवलं, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.

कणकवली शहरातील नरडवे फाटा येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबरला हल्ला झाला होता. या प्रकरणी आमदार राणे २८ जानेवारीला जिल्हा न्यायालयात हजर झाले. त्यांनी नियमित जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. तो अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करून घेण्यात आला. न्यायाधीश रोटे यांनी यावर प्राथमिक युक्तिवाद ऐकून घेतला. सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुनावणी चालली. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील घरत, भूषण साळवी यांनी आमदार राणे यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. बचाव पक्षाच्या वतीने बाजू मांडताना सतीश मानशिंदे यांनी आमदार राणे यांना जामीन मिळावा यासाठी युक्तिवाद केला. त्यांना वकील संग्राम देसाई, राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर यांच्यासह अन्य वकिलांच्या पथकाने साथ दिली.

अटक करण्यासाठी व्यूहरचना

आमदार राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी होती. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला तर तत्काळ राणे यांना अटक करण्याची पोलिसांनी व्यूहरचना आखली होती. जिल्हा न्यायालयात पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा मोठा बंदोबस्त होता. यानंतर न्यायालय इमारती बाहेर एसआरपीची तुकडी तैनात होती. पोलिससुद्धा मोठ्या प्रमाणात होते. याचप्रमाणे सिंधुदुर्गनगरीच्या नाक्यानाक्यांवर बंदोबस्त होता. या सर्व सुरक्षा यंत्रणेवर अप्पर पोलिस अधीक्षक नितीन बगाटे लक्ष ठेवून होते.

परब यांचाही अटकेसाठी अर्ज –

हल्ला झालेले संतोष परब यांनी न्यायालयात लेखी अर्ज सादर करीत आमदार राणे यांना जामीन देण्यात येऊ नये, अशी मागणी केली. यावेळी ते स्वतः जिल्हा न्यायालयात उपस्थित होते. आमदार राणे यांना जामीन देऊ नये, यासाठी केलेल्या लेखी अर्जावर बाजू मांडण्यासाठी परब यांनी कोल्हापूर येथील वकील नियुक्त केले होते.

..तर टाडासुद्धा लावला असता..

शिवसैनिक परब हल्लाप्रकरणी आमदार राणे यांच्या बाजूने युक्तिवाद करताना वकील संदीप मानशिंदे यांनी नशिब टाडा रद्द झाला आहे; अन्यथा टाडासुद्धा लावला असता अशा प्रकारची नाराजी पोलिसांच्या कारभारावर व्यक्त केली. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीविरोधात वकील मानशिंदे यांनी जोरदार आक्षेप घेतला. यावेळी त्यांनी अन्य उच्च न्यायालयांतील निकालांचे दाखलेही दिले. त्यांनी बाजू मांडताना पोलिसांनी हे प्रकरण ज्या प्रकारे हाताळले आहे ते पाहता टाडा कायदा असता तर तो सुद्धा लावला असता, असे दिसत असल्याचे सांगितले.

अभिप्राय द्या..