वेंगुर्ला तालुक्यात पावसामुळे मोठे नुकसान..

वेंगुर्ला तालुक्यात पावसामुळे मोठे नुकसान..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे परबवाडा भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.परबवाडा येथे एक घर पूर्ण कोसळले असून १० ते १५ घरांमध्ये पाणी घुसून लाखोंची हानी झाली आहे.परबवाडा येथील मासुरावाडी, गवंडेवाडी, भोवरवाडी, देसाईवाडी व कणकेवाडी या भागात परतीच्या पावसामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. एक घर पूर्ण पडले असून काहींच्या घरांच्या भिंती कोसळले तर काहींच्या घरात दोन फूट पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावातील मधुकर गवंडे यांचे पूर्ण घर कोसळून नुकसान झाले आहे.तर स्वप्नील परब व अजित गवंडे यांच्या घरांच्या भिंती कोसळून नुकसान झाले आहे. या व्यतिरिक्त अल्बर्ट फर्नांडिस, जीजी साटेलकर, सिरील फर्नांडिस,साटेलकर यांच्यासह या भागातील १५ घरांमध्ये पाणी घुसल्याने घरातील तांदूळ, नारळ, अन्य वस्तू व साहित्य भिजून लाखोंचे नुकसान झाले आहे.दरम्यान या भागातील नुकसानीची वेंगुर्ला भाजपचे तालुकाप्रमुख सुहास गवंडळकर,जि.प.सदस्य दादा कुबल,सरपंच पपू परब,उपसरपंच संजय मळगावकर आदींनी पाहणी केली.यावेळी तलाठी सायली आंदुर्लकर,ग्रामसेवक संदीप गवस आदींनी पंचयादी केली आहे.

तसेच परबवाडा कणकेवाडी येथील मिनी अंगणवाडीचे नुकसान, परबवाडा टाकाची व्हाळी ते रामघाट रस्ता येथील संरक्षक भिंत कोसळून नुकसान, परबवाडा गवंडेवाडी ते नमसवाडी येथील साईडपट्टी वाहून नुकसान झाले आहे.होडावडा येथे सोमवारी रात्री एका घरात पाणी शिरल्याने संबंधिताना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते.तसेच सातेरी मंदिर येथे पुलाचा भाग कोसळून नुकसान,कॅम्प प्रागतिक शाळा येथील संरक्षक कठडा तुटून नुकसान,दाभोली नाका चर्चनजिक कठडा कोसळून नुकसान झाले आहे.तसेच भटवाडी येथील पपू सरमळकर,प्रकाश धावडे यांचेही नुकसान झाले आहे.दरम्यान तालुक्यासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने भातशेतीचेही नुकसान झाले आहे.शहर भागात नुकसानीची नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर आदींनी पाहणी केली आहे.

अभिप्राय द्या..