You are currently viewing चोरी केल्याप्रकरणी एकास दोन दिवसाची पोलिस कोठडी…

चोरी केल्याप्रकरणी एकास दोन दिवसाची पोलिस कोठडी…

मालवण /-

मालवण तालुक्यातील तिरवडे उगवतीवाडी येथील एका कन्स्ट्रक्शन साईट वरील साहित्यासह मोटारसायकल चोरी करून फरार झालेल्या संशयित गणेश काळूराम भगत ( वय ३०, रा. शिलारवाडी, शिलारगाव, शिलार, ता. कर्जत, जि. रायगड) याला पोलिसांनी अटक करून मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कुडाळ तालुक्यातील पडवे शिर्केवाडी येथील आनंद शंकर दामोदर यांचा मालवण तालुक्यातील तिरवडे उगवतीवाडी येथे आनंदवन नावाची कन्स्ट्रक्शन साईट असून त्याठिकाणी प्रोजेक्ट कामगार म्हणून गणेश भगत हा काम करत होता. दामोदर यांनी गणेश याला कामासाठी मोटार सायकल दिली होती. मात्र दि.२० नोव्हेंबर २०२१ रोजी गणेश याने मोटरसायकलसह दहा वायर बंडल, पाच सिलिंग फॅन, एक कपाट, एक टेबल, चार खुर्च्या, दोन लोखंडी टिकाव, ६ खोरी, १० फायबरची घमेलं असे साहित्य चोरून कन्स्ट्रक्शन साईटवरून पोबारा केला होता. त्यामुळे आनंद दामोदर यांनी गणेश याच्या विरोधात मालवण पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी गणेश भगत याच्यावर भा.द. वि. कलम ३८१ अन्वये गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी पोलिसांनी आज गणेश भगत याला अटक करून मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गणेश याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी वकील हृदयनाथ चव्हाण यांनी काम पाहिले.

अभिप्राय द्या..