वेंगुर्ला /-

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोपवाटीकाधारक यांच्यासाठी  दुर्लक्षित वनस्पती कलम बांधणी व रोपवाटिका व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणाचा २४ नर्सरीधारकांनी लाभ घेतला.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे सुरंगी, त्रिफळ, वटसोल, वावडिंग, कडीकोकम आणि स्थानिक जांभूळ या पिकांचे  सर्वेक्षण, उत्कृष्ट वाण ओळख, अभिवृद्धी आणि कलम (रोपे) निर्मिती याविषयी गेली तीन वर्षे संशोधन करण्यात आले आहे. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे या पिकांची मोठ्या प्रमाणावर कलमे निर्मिती करून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक पिकाची गावे निर्माण करण्यात येत आहेत. या पिकांची लागवड आणि प्रसार मोठ्या प्रमाणात होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये भर पडावी,या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोपवाटिकाधारक यांच्यासाठी  या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये या पिकांना असलेला वाव,त्यांची उत्पादन क्षमता, कलम बांधणीच्या विविध पद्धती इत्यादी विषयी बौद्धिक तसेच प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.या प्रशिक्षणादरम्यान रमेश वरक, जगदीश भुवड व ललित दळवी यांनी प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक दाखविले. सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.याप्रसंगी हे प्रशिक्षण आम्हाला खूपच मार्गदर्शक ठरले असून विद्यापीठाच्या मानसाप्रमाणे आम्हीसुद्धा या पिकांच्या लागवडीसाठी आणि प्रसारासाठी कार्यरत राहू असा विश्वास प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केला.सदर प्रशिक्षण प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले चे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. एन. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. यावेळी डॉ.व्ही. एस. देसाई,डॉ. एम.पी. सणस,डॉ.एन.व्ही. गावडे तसेच लुपिन फाऊंडेशनचे प्रताप चव्हाण यांच्या प्रयत्नातून हे प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page