सिंधुदुर्ग /-

कणकवली – कळसुली जाणाऱ्या एस. टी.वर 12 जानेवारी रोजी सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा अज्ञाताकडून दगडफेक केल्याची घटना घडली आहे. आठवड्यातील ही दुसरी घटना असून एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू असून एसटी प्रशासनाने एसटी सुरू करण्याचा प्रयत्न केला असल्याने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मधून नाराजी व्यक्त होत आहे. त्यातूनच हा प्रकार घडला असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे.

कणकवली आगारातून सकाळी 7. 30 वाजता (एमएच 20 बीएल 4082) ही एसटी कळसुलीच्या दिशेने जात असताना हळवल येथे या एसटीवर अज्ञाताने एसटीच्या समोरील काचेवर दगडफेक केली .काही कळण्याच्या आतच तो पसार झाल्याची घटना घडली. यावेळी तीन प्रवासी एसटीतुन प्रवास करत होते. मात्र यात कुठल्याही प्रवासी किंवा चालक वाहकास दुखापत झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.या एसटीमध्ये चालक म्हणून एस. ए. चव्हाण व वाहक म्हणून आर. पी. लोकरे हे कार्यरत होते. घटनेनंतर यासंदर्भात कणकवली पोलिसात तक्रार नोंदविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.ही आठवड्यातील दुसरी घटना असल्याने याकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे तर दुसरीकडे चालक व वाहक तसेच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधिताला कडक शासन व्हावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page