You are currently viewing स्त्री जाणिवांचा पहिला निर्भय हुंकार म्हणजे सावित्रीबाई फुले.;कवयित्री सरिता पवार यांचे कणकवलीत प्रतिपादन.

स्त्री जाणिवांचा पहिला निर्भय हुंकार म्हणजे सावित्रीबाई फुले.;कवयित्री सरिता पवार यांचे कणकवलीत प्रतिपादन.

कणकवली/-

चाकोरीबाहेरील विचार मांडणाऱ्यांना आज सातत्याने ट्रोल केले जात आहे.आजही येथील स्त्री समानतेसाठी संघर्ष करताना दिसुन येते.खऱ्या अर्थाने महिलांना विचारप्रवृत्त करायचे असेल तर त्यांना ज्ञानप्रवृत्त करायला हवे. या साठी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श हवा कारण या देशातील स्त्री जाणिवांचा पहिला निर्भय हुंकार म्हणून सावित्रीबाई फुले यांचा गौरव करावा लागेल. आजच्या काळात समाजातील अमानवीय चालींना लगाम घालण्यासाठी सातत्याने चळवळ उभी उभारली पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या सरिता पवार यांनी व्यक्त केले.

येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात महिला विकास कक्षाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सरिता पवार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राजेंद्रकुमार चौगुले होते तर प्रमुख वक्त्या म्हणून प्रा.नम्रता पाटील व प्रा. मीना महाडेश्वर यांनी विचार मांडले.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. प्रा. नम्रता पाटील यांनी ‘ समाजामध्ये धर्मव्यवस्थेने घालून दिलेली बंधने आजही कायम आहेत. ही विषमतावादी व्यवस्था बदलण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले’ असे सांगितले तर प्रा. मीना महाडेश्वर यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या चरीत्रावर प्रकाश टाकला.”आज सर्व स्तरात स्त्रियांचे कर्तृत्व मान्य केले पाहिजे आणि महिलांनी सुशिक्षित होण्याबरोबर सुसंस्कृत सुद्धां झाले पाहिजे” असे त्यांनी सांगितले. यावेळी मंचावर पर्यवेक्षक मंगलदास कांबळे,प्रा.वनिता सावंत उपस्थित होते.

अध्यक्ष मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.राजेंद्रकुमार चौगुले यांनी “जनतेची सेवा करण्यातच खऱ्या अर्थाने महामानवांनी जीवन सार्थकी लावले आहे, महामानवांचा विचार वास्तव जगण्यामध्ये स्वीकारला पाहिजे. समाजात आजही काही उच्चशिक्षित मंडळी ‘उक्ती आणि कृती’ यामध्ये फरक ठेवताना दिसतात हे दुर्दैव आहे”.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विनया रासम यांनी केले. प्रास्ताविक महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. प्रियांका लोकरे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. दीपा तेंडोलकर यांनी केले. या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महिला वर्ग , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिप्राय द्या..