You are currently viewing जि.प. योजना व वाढीव उपकरण योजनेतील १० कोटी ४५ हजारांचा निधी अद्यापही अखर्चितच.

जि.प. योजना व वाढीव उपकरण योजनेतील १० कोटी ४५ हजारांचा निधी अद्यापही अखर्चितच.

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्हा परिषद वाढीव उपकरण व्यतिरिक्त योजना व वाढीव उपकरणातील योजनांसाठी एकूण मंजूर १० कोटी ८७ लाख १७ हजार १०० रुपये निधीपैकी ४२ लाख ३ हजार ०२९ रुपये एवढा निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. अद्यापही १० कोटी ४५ लाख १४ हजार ०७१ रुपये निधी अखर्चित राहिला असल्याची माहिती बांधकाम समिती सभेत दिलेल्या अहवालावरून उघड झाली.

जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा सभापती महेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा बांधकाम कार्यकारी अभियंता लक्ष्मण परुळेकर, सदस्य राजेश कविटकर, रेश्मा सावंत, मनस्वी घारे, स्वरूपा विखाळे, आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

आजच्या बांधकाम समिती सभेत सन २०२१- २२ चा जिल्हा परिषद योजना खर्चाचा आढावा घेतला असता जिल्हा परिषद वाढिव उपकरा व्यतिरिक्त योजनांचा मंजूर ४ कोटी ९२ लाख ७३ हजार ९०० निधीपैकी आतापर्यंत केवळ १८ लाख ८२ हजार १५४ रुपये निधी खर्च झाला असून अद्यापही तब्बल ४ कोटी ७३ लाख ९१ हजार ७४६ रुपये निधी शिल्लक आहे. तसेच जिल्हा परिषद वाढिव उपनगरातील योजनांसाठी मंजूर ५ कोटी ९४ लाख ४३ हजार २०० रुपये निधीपैकी आतापर्यंत २३ लाख २० हजार ८७५ रुपये निधी खर्च झाला असून अद्यापही ५ कोटी ७१ लाख २२ हजार ३२५ रुपये निधी शिल्लक आहे. असा एकूण १० कोटी ८७ लाख १७ हजार १०० रूपये निधीपैकी ४२ लाख ०३ हजार ०२९ रुपये निधी खर्च झाला आहे. तर तब्बल १० कोटी ४५ लाख १४ हजार ०७१ रुपये निधी अद्यापही अखर्चित आहे. हा निधीचा डोंगर मार्चअखेर पुर्वी खर्च करण्याचे आव्हान जिल्हा परिषदेसमोर असल्याचे अहवालावरून उघड झाले आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक शाळा आता डिसेंबरमध्ये सुरू होणार आहेत. असे असताना अद्यापही जिल्ह्यातील अनेक शाळांची दुरुस्ती झालेली नाही. झाराप प्राथमिक शाळेचा कोनवासा मोडून ती धोकादायक बनली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना बसवणे धोक्याचे ठरू शकते. असे असतानाही या शाळेच्या दुरुस्तीकडे अनेकदा सभागृहाचे लक्ष वेधले असताना प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणताही अनर्थ घडल्यास प्रशासनास जबाबदार धरले जाईल. असा इशारा राजेश कविटकर यांनी सभेत दिला. तर तेर्सेबांबर्डे, माणगाव तळीवाडी या शाळेच्या दुरुस्तीवर दोन -दोन वेळा निधी खर्च करण्यात आला आहे.तो कसा झाला? याबाबतची माहिती पुढील सभेत देण्यात यावी. अशी मागणी सदस्य राजेश कविटकर यांनी सभेत केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता एकामागून एक निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने आचारसंहिता लागणार आहे. तरी प्राप्त निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. मंजूर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची कार्यवाही करावी. असे आदेश सभापती महेंद्र चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा