गोकुळ दुध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचे मार्गदर्शन..
सिंधुदुर्गनगरी /-
सिधुदुर्ग जिल्हा बँक ,गोकुळ दुध संघ ,भगिरथ प्रतिष्ठान,समृध्दी डेअरी फार्म माडखोल या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने दि १२ नोव्हेंबर रोजी माध्यमिक पतसंस्था ओरोस येथे दूध उत्पादन संस्था व शेतकरी यांच्यासाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दि२ ऑक्टोबर २०२१ रोजी येथील दूध उत्पादन संस्था प्रतिनिधींसह कोल्हापूर येथील गोकुळ दूध संस्थेला भेट देण्यात आली होती. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री बंटी पाटील तसेच गोकुळ दूध संघाचे जिल्हाध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या समवेत दूध उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने काय करता येईल, कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादन संस्था व शेतकरी यांच्यासाठी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता ओरोस येथील माध्यमिक पतसंस्था सभागृह येथे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन मेळाव्यामध्ये गोकुळ संघाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील तसेच भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर हे मार्गदर्शन करणार आहेत. तर आमदार वैभव नाईक हे या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादनाच्या वाढीसाठी गोकुळ दूध संघाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा प्रमाणे येथील दूध उत्पादन संस्थाना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच चांगल्या प्रतीची जनावरे पैदास करण्यावर भर दिला जाणार आहे. जिल्ह्यात प्रतिवर्षी २० हजार लिटर दूध उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करताना नवीन संकरित जातीची जनावरे खरेदी करण्यावर भर दिली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा बँकेचे शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य राहणार आहे. ९० टक्के दुधाळ जनावरे ही जिल्ह्याबाहेरील चांगल्या जातीची खरेदी होतील या दृष्टीने प्रयत्न राहणार आहेत. गोकुळ दूध संघाच्या उद्दिष्ट प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिवर्षी २० हजार लिटर दूध उत्पादनात वाढ तसेच पुढील ५ वर्षात १ लाख लिटर दूध उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. या उद्दिष्ट प्रमाणे दूध उत्पादनात वाढ झाल्यास जिल्ह्यात १०० ते १२५ कोटीची प्रतिवर्षी उलाढाल होऊ शकते. त्यासाठी शेतकरी आणि दूध उत्पादक संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना मार्गदर्शन होण्याची गरज आहे. त्यासाठी १२ नोव्हेंबर रोजीच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये जिल्ह्यातील दूध उत्पादन संस्था व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व दूध संघाचे जिल्हाध्यक्ष एम. के. गावडे यांनी केले आहे.