दोडामार्ग /-
दोडामार्ग भाजपच्या पदधिकार्यांचे गेले तीन दिवस सुरू असलेले उपोषण अखेर आज स्थगित करण्यात आले.तत्पुर्वी आम.नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना चांगकेच फैलावर घेतले. ठेकेदारांचे लाड करणे थांबवा.ठेकेदारांनी काम का केलं नाही याचे उत्तर जनतेला अधिकाऱ्यांनी द्यावं.ठेकेदार सरकारचे जावई आहेत का असा सवाल आ.नितेश राणे यांनी करत यापुढे येथील रस्त्यांची कामे ज्यांनी घेतलीत ती वेळेत पूर्ण न झाल्यास ठेकेदार आणि अधिकारी यांची गय केली जाणार नाही असा इशारा आ.नितेश राणे यांनी प्रशासनाला दिला.आम.राणे यांनी या आंदोलन स्थळी भेट देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.अखेर कामाची वर्क ऑर्डर दिल्याचे पत्र देण्यात आल्यानंतर दोडामार्ग भाजपच्या पदधिकार्यांनी गेले तीन दिवस सुरू असलेले उपोषण अखेर स्थगित केले.मात्र आता उपोषण मागे घेतले म्हणजे आमची बोळवण कराल असे समजू नका,आमच्याकडे अन्य मार्गही लोकशाहीचे आहेत असे सांगत कणकवली येथील चिखलफेक आंदोलनाची आठवण आ.नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना करून दिली. यावेळी आ.राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता अनामिका जाधव यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, लोकांनी निवडून दिलंय, म्हणजे लोकांचे प्रश्नही आम्हीच सोडवणार.पण तुम्ही आणि ठेकेदार जर योग्य प्रकारे काम करत नसाल तर आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल असे आ.नितेश राणे यांनी ठणकावले.
तर तहसीलदार अरुण खानोलकर यांनाही आ.नितेश राणे यांनी सुनावत तुम्हीही तालुक्यातील या गंभीर प्रश्नाकडे जर लक्ष दिले असते तर ही वेळच आली असती असा डोस दिला.
दरम्यान येत्या काही दिवसात त्या संबंधित ठेकेदार आणि सर्व अधिकारी यांची बैठक दोडामार्गात लावा.त्यावेळी बघूया तरी हे ठेकेदार कुठल्या कातडीचे आहेत.त्यांना देण्यासाठी आमच्याकडे व्हॅक्सिन उपलब्ध आहे,आणि ती कशी टोचावी हेसुद्धा मी बघेन असा इशारा दिला आहे.अखेर कामाची वर्क ऑर्डर निघाल्याने आ.नितेश राणे यांच्याहस्ते उपोषणकर्ते प्रवीण गवस,लक्ष्मण उर्फ बाळा नाईक, चेतन चव्हाण यांनी लिंबूपाणी घेत आंदोलन स्थगित केले.
यावेळी आ.नितेश राणे यांनी या दोडामार्ग बांदा रस्त्याच्या कामाचे श्रेय हे आमच्या भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे असल्याचेही आ.राणे यांनी स्पष्ट केले.यावेळी शैलेश दळवी,राजेंद्र निंबाळकर,पराशर सावंत,राजेश फुलारी,विलास सावंत,रंगनाथ गवस,संजय सातार्डेकर, पराशर सावंत,देवेंद्र शेटकर,विठोबा पालयेकर, सुनील गवस,संतोष नाईक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.