मालवण /-
सर्वसाधारण पणे एप्रिल मे महिन्यात आंब्याचा हंगाम सुरू होत असताना नोव्हेंबर महिन्यातच आंब्याची गोड, गोड,,फोड पुणेकरांना चाखायला लावण्याची किमया मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांनी करीत या हंगामातील पहिली देवगड हापुसची पेटी पुण्याला पाठविली आहे.जुलै महिन्यात अतिवृष्टी असतानाही आंब्याच्या मोहोर आणि फळाचे उत्तम व्यवस्थापन करीत श्री. फोंडेकर यांनी पाच पाच डझनाच्या दोन आंबा पेट्यांची त्यांनी मुहूर्ताची थेट विक्री प्रति पेटी अठरा हजार रुपये किंमतीला केली आहे. मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी वीस ते पंचवीस दिवस अगोदर पहिली हापूस आंब्याची पेटी पुण्याला धाडली आहे. यापूर्वी श्री. फोंडेकर यांनी २०१८ आणि २०१९ मध्ये त्यांनी सलग दोन वेळा कोकणातून पहिली पेटी पाठविण्याचा मान मिळविला होता. आता तिसऱ्यांदा श्री. फोंडेकर यांनी ही किमया साधली आहे. सर्वसाधारण पणे जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात श्री. फोंडेकर यांच्या बागेतील सहा ते सात हापूस कलमांना मोहोर आला होता. याच दरम्यान तुफान अतिवृष्टी झाली होती मात्र, फोंडेकर यांनी न डगमगता उत्तम व्यवस्थापन करून त्यांनी मोहोर आणि फळांचे संरक्षण केले व गरजेनुसार विविध कीटकनाशके, बुरशीनाशकांच्या फवारण्या केल्या. फोंडेकर यांनी याबाबत शुक्रवारी माहिती देताना सांगितले, पावसाळी हंगामात झाडांवर प्लास्टिक आच्छादन किंवा शेडनेट लावून पावसापासून मोहर व फळ यांचा बचाव करावा लागतो. बुरशी, तुडतुडा, कीड आदींपासून संरक्षण करण्यासाठी दर १५ दिवसानी औषध फवारणी केली जाते. पावसाळी फळ साडेतीन चार महिन्यात तयार होते. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर आंबा परिपक्व होण्यास सुरुवात झाल्याचे श्री. फोंडेकर यांच्या लक्षात आले. या कामी त्यांना फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले आणि मालवणच्या कृषी विभागाने मार्गदर्शन केले. गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास त्या सहा झाडांवरील आंबा फळांची काढणी करण्यात आली व हे सर्व आंबे दोन पेट्यांमध्ये बंद करून पुणे येथे थेट विक्रीसाठी हापूस आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांच्या माध्यमातून विक्रीसाठी पाठविण्यात आले आहेत.