You are currently viewing जिल्हा परिषदेत बचतगटाचे स्टॉल तीन दिवस दिवाळी फराळ विक्रीसाठी उपलब्ध..

जिल्हा परिषदेत बचतगटाचे स्टॉल तीन दिवस दिवाळी फराळ विक्रीसाठी उपलब्ध..

ओरोस /-

दिवाळी सणाच्या पाश्वभूमीवर राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये बचतगट समूहांनी उत्पादित केलेला फराळ व दीपावली वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. १ ते ३ नोव्हेंबर असे तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी दिपप्रज्वलन करून केले.      राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत बचतगट समूह यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन गणेशोत्सव कालावधीत मांडण्यात आले होते. यावेळी सुमारे २० हजार रुपयांची विक्री झाली होती. जिल्हा परिषदेत असलेल्या कर्मचारी-अधिकारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे दिवाळी निमित्त पुन्हा तशाच प्रकारे संधी उपलब्ध करून देत बचतगट समूह उत्पादित मालाची विक्री स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये दिवाळीसाठी फराळ म्हणून वापरण्यात येणारे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. याशिवाय पणती व अन्य मातीची भांडी सुद्धा विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.     

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ सावंत यांच्याहस्ते याचे उदघाटन झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर, वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, महिला व बाल कल्याण सभापती शर्वाणी गांवकर, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा व्यवस्थापक वैभव पवार, ओरोस सरपंच प्रीती देसाई यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी, सहभागी बचतगट समूहांच्या महिला यावेळी उपस्थित होत्या.

अभिप्राय द्या..