करोना टाळेबंदीत बेरोजगारीची वेळ आल्याने मुलांचे पालनपोषण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य झाल्याने, दारुच्या आहारी गेलेल्या एका व्यक्तीने आपल्या पोटच्या मुलालाच तृतीयपंथीला पाच लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक व संतापजनक प्रकार रविवारी उघडकीस आला आहे, उत्तम पाटील असे त्या व्यक्तीचे नाव आहे.
हा व्यक्ती मूळचा पन्हाळा तालुक्यातील काटेभोगाव येथील रहिवासी असून, तो कामानिमित्त कोल्हापुरात चांदी कारागीर आहे. टाळेबंदीमध्ये रोजगारावर कुऱ्हाड कोसळली व संसाराचा गाडा हाकणे कठीण झाले. यातूनच तो दारुच्या आहारी गेल्याने आर्थिक अडचणीत सापडला होता. त्याच्यावर कर्जही होते. काही दिवसानंतर उत्तम याने पत्नी आणि लहान मुलाला माहेरी पाठवले. तर मोठ्या मुलाला तृतीयपंथीयांच्या ताब्यात दिले. मे महिन्यात नोटीसीद्वारे एका तृतीयपंथीयाने ५ लाख रुपयांच्या बदल्यात या मुलाला आपल्याकडे ठेवल्याचे उघडकीस आले आहे.
मुलाच्या आजोबांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपल्या नातवाला परत आणण्यासाठी प्रयत्न केले. तृतीयपंथीयांनी ‘पाच लाख द्या आणि मुलाला घेऊन जा’ असे सांगितले. आजोबांनी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पोलिसांकडे धाव घेतली. कोल्हापूरच्या उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी मुलाचा ताबा घेऊन त्याला बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले आहे. दरम्यान आता मुलाच्या ताब्याचा निर्णय न्यायालयात होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.