नवी दिल्ली /-

दिल्लीच्या विशेष पोलीस पथकाने गोपनीयता कायद्यांतर्गत (Official Secrets Act (OSA) एका पत्रकाराला अटक केली आहे. सरंक्षण विभागाची वर्गीकृत केलेली गोपनीय अशी माहिती त्याने आपल्या ताब्यात घेतली होती. तसेच यातील काही संवेदनशील माहिती त्याने चीनला पुरवली असल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी या पत्रकारावर लावला आहे. या पत्रकारासोबतच त्याचा एक नेपाळी सहकारी आणि एका चीनी महिला सहकारी देखील अटक करण्यात आली आहे.बोगस कंपन्यांच्या माध्यमातून या दोघांनी संबंधित पत्रकाराला मोठी रक्कम दिली असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

राजीव शर्मा असे या मुक्त पत्रकाराचे नाव असून तो दिल्लीच्या पीतमपुरा भागात राहतो. भरघोस पैशांच्या मोबदल्यात शर्मा चायनीज गुप्तहेरांना भारतातील संवेदनशील माहिती पुरवायचा.राजीवकडून अनेक मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर संवेदनशील माहिती जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असून न्यायालयाने राजीव आणि त्याच्या साथीदारांना सहा दिवसांची कोठडी सुनावली आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाचे प्रमुख संजीव कुमार यादव यांनी सांगितले की, राजीव शर्मा हा २०१६ ते २०१८ या काळात सरंक्षण क्षेत्र आणि राजकीय कुटनीतीची गोपनीय माहिती चीनी गुप्तहेरांना पुरवित होता. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या खबरीनंतर पोलिसांनी राजीव शर्माला ताब्यात घेतले. शर्माची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी एक चीनी आणि नेपाळी नागरिकाला अटक केली. अटक केलेली चीनी महिला ही २०१४ साली भारतात शिक्षणासाठी आली होती. केंद्रीय विद्यापीठात तिने प्रवेश घेतला होता, ती सध्या नवी दिल्ली येथे राहत होती.

१४ सप्टेंबरला झाली होती अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १४ सप्टेंबर रोजी ही अटक झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी न्यायदंडाधिकाऱ्यासमोर त्याला हजर करण्यात आले होते. त्यानंतर सहा दिवसांची कोठडी मिळाल्यावर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली होती. आता २२ सप्टेंबर रोजी त्याच्या जामीन अर्जावर पतियाळा कोर्टात सुनावणी होणार आहे. राजीव शर्मा याने आतापर्यंत न्यूज ऑफ इंडिया, द ट्रिब्यून, सकाळ टाइम्ससाठी पत्रकारिता केली आहे. तसेच इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार त्याने हल्ली चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाइम्ससाठी लिहायला सुरुवात केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page