You are currently viewing किरीट सोमय्या आपण दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष देणार का.?जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांचा सवाल..

किरीट सोमय्या आपण दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष देणार का.?जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांचा सवाल..

कणकवली/-

सिंधुदुर्ग जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाची स्थापना सहकारमहर्षी शिवराम जाधव यांनी केली. कुडाळ एमआयडीसी परिसरात युनिट स्थापन करून हिरकणी नावाच्या ब्रॅंडखाली सिंधुदुर्गातील शेतक-यांचे दुध त्यांनी मार्केटमध्ये आणले. शिवराम जाधव यांच्या निधनानंतर जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाला ६५ लाखांचा तोटा झाला.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने दुध उत्पादक संघावर जप्तीचे निर्देश दिलेत. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाचे तत्कालीन चेअरमन श्री.एम.के.गावडे यांनी स्वतःची मालमत्ता तारण ठेवून कर्ज फेडत दुध उत्पादक संघाची जप्ती थांबवली. त्यानंतर जिल्हा दुध उत्पादक संघाने पुन्हा एकदा जिल्ह्यातील शेतक-यांकडून दुध संकलित करून ते माजी आमदार प्रमोद जठार यांच्या माध्यमातून महानंदाला दिले.

जिल्हा दुध उत्पादक संघ आपल्या ताब्यात राहावा म्हणून आमदार नितेश राणेंनी राजकीय खेळी करत एप्रिल २०१७ मध्ये चव्हाण ग्रुप ऑफ कंपनीची प्रतिभा दुध डेअरी सल्लागार म्हणून पुढे आणून जिल्हा दुध उत्पादक संघाकडून संकलित होणा-या दुधाचे मार्केटिंग करणार असल्याचे जाहीर केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ लाख लीटर दुध संकलन करण्याच्या व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतक-यांना १० हजार दुधाळ जनावरे वाटप करण्याच्या बाता मारण्यात आल्या. नारायण राणेंनी तर मुलाच्या या पराक्रमाला ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धवलक्रांती’ ची उपमा देऊन टाकली. जिल्हा दुध संघावरील आर्थिक संकट दूर करण्यासाठी आम्ही प्रतिभा दुध डेअरीच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुध संकलनात स्पर्धा व्हावी आणि शेतक-यांना चांगला भाव मिळावा, यासाठी हा संकल्प हाती घेण्यात आल्याचे आमदार नितेश राणेंनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतक-यांकडून जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाने दुध खरेदी करून ते प्रतिभा डेअरीला द्यावे आणि प्रतिभा दुध डेअरी त्या दुधाचा मोबदला जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाला देईल. लोकप्रतिनिधी व आमदार म्हणून नितेश राणेंनी या सर्व व्यवहाराची जबाबदारी स्वीकारली.

सिंधुदुर्गातील दुध उत्पादक शेतक-यांनी आपल्या दुधाला चांगला भाव मिळेल म्हणून जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाला आपल्या गायी-म्हशींचे दुध विक्री केले. जिल्हा दुध उत्पादक संघानेही कर्जाची परतफेड होऊन आर्थिक संकट दूर होईल या अपेक्षेने प्रतिभा दुध डेअरीला शेतक-यांकडून संकलित केलेले दुध विकले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकरी असतील किंवा जिल्हा दुध उत्पादक संघाचे प्रतिनिधी या दोघांनाही चव्हाण ग्रुप ऑफ कंपनी आणि प्रतिभा दुध डेअरीचे कोल्हापूर जिल्ह्यातील कारनामे माहिती नव्हते. प्रतिभा दुध डेअरीचे श्री. सतीश चव्हाण यांनी कोल्हापूरमध्ये बँकाकडून कर्जे घेऊन त्यांची परतफेड केलेली नाही. अशा कर्जबाजारी माणसाच्या हाती आमदार नितेश राणेंनी जिल्हा दुध उत्पादक सहकारी संस्थेचे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब शेतक-यांचे भवितव्य दिले. त्यांनी पद्धतशीरपणे अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हा दुध उत्पादक सहकारी संस्थेला चुना लावला. प्रतिभा दुध डेअरीने जिल्हा दुध उत्पादक संघाकडून वर्षभर दुध घेतले परंतु त्या दुधाचे पैसेच दिले नाहीत. प्रतिभा दुध डेअरी पैसे देत नसल्यामुळे जिल्हा दुध उत्पादक संघ सिंधुदुर्गातील गोरगरीब शेतक-यांना त्यांच्याकडून संकलित केलेल्या दुधाचे पैसे देऊ शकला नाही. अशा प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतक-यांचे स्वकष्टाचे सुमारे २ कोटी २५ लाख रुपये प्रतिभा दुध डेअरीने थकवले. एप्रिल २०१७ मध्ये आमदार नितेश राणेंनी लोकप्रतिनिधी व मध्यस्थ म्हणून या सर्व व्यवहाराची जबाबदारी घेतली होती. परंतु आता प्रकरण अंगाशी येताच त्यांनी अगदी रीतसरपणे आपले हात झटकले आहेत. शेवटी माणगाव सारख्या गावातील जिल्हा दुध उत्पादक संघाच्या प्रतिंनिधींवर जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतक-यांचे दुधाचे पैसे देण्यासाठी अनेक वर्षांची फिक्स डिपोझिट मोडीत काढण्याची वेळ आली आहे. अशा प्रकारे आमदार नितेश राणेंच्या शब्दावर विश्वास ठेवून जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकरी दोघेही देशोधडीला लागले आहेत. त्यामुळे भविष्यात प्रतिभा दुध डेअरीसारख्या कर्जबुडव्या आणि लोकांचे पैसे थकवणा-या संस्था जिल्ह्यात घेऊन येणा-या आमदार नितेश राणेंवर सिंधुदुर्गातील जनतेने कितपत विश्वास ठेवायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. प्रतिभा दुध डेअरीच्या माध्यमातून आमदार नितेश राणेंनी जिल्ह्यातील दुध उत्पादक सहकारी संघाची आणि शेतक-यांची जी सव्वा दोन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांची उरलीसुरली विश्वासाहार्ता देखील संपुष्टात आली आहे. सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतक-यांना आमदार नितेश राणेंनी देशोधडीला लावले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असलेले किरीट सोमय्या साहेब याकडे लक्ष देतील का…? असा सवाल यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष तथा शिवसेना नेते सतिश सावंत यांनी केला आहे.

अभिप्राय द्या..