मालवण /-
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनामुळे बळी गेलेल्या राज्यातील दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना तातडीने ५० लाखांची मदत देण्यात यावी. ही मदत देताना एखादा पत्रकार तालुका अथवा जिल्हा पत्रकार संघाचा सदस्य नसला तरी स्थानिक पत्रकार संघाच्या शिफारशीनुसार त्याला मदत देण्यात यावी, अशी मागणी मालवण तालूका पत्रकार समितीने प्रांताधिकारी वंदना खरमाळे आणि तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मराठी पत्रकार परिषद आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या सूचनेनुसार मालवण तालुका पत्रकार समितीने शुक्रवारी राज्यातील पत्रकारांचा आरोग्य विमा उतरवून कोरोनामूळे बळी गेलेल्या पत्रकारांना कोरोना योद्द्धे म्हणून ५० लाख रुपयांची मदत करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना सादर केले. यावेळी पत्रकार समिती अध्यक्ष प्रफुल्ल देसाई, नंदकिशोर महाजन, विद्याधर केनवडेकर, कुणाल मांजरेकर, महेश कदम, अमित खोत, कृष्णा ढोलम, समीर म्हाडगूत, भूषण मेतर, आप्पा मालंडकर आदी उपस्थित होते. या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रात कोरोनाचं संकट अधिक उग्र आणि व्यापक झालेलं आहे.. माध्यम क्षेत्र देखील त्यापासून अलिप्त राहिलेलं नाही. ५०० पेक्षा जास्त पत्रकारांना कोरोनाची लागण झालेली आहे, ५० च्या जवळपास पत्रकारांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत, आणि कोरोनानं २५ पत्रकारांचे बळी गेले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथील एका कार्यक्रमात बोलताना पत्रकार हे कोरोना यौध्दे असून कोरोनामुळे पत्रकाराचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ५० लाख रूपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र कोरोनानं २५ पत्रकारांचे बळी गेल्यानंतर देखील एकाही पत्रकाराच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत मिळाली नाही. त्यामुळे सरकारने घोषणा केल्या प्रमाणे दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना तातडीने ५० लाख रूपयांची आर्थिक मदत मिळावी. ही मदत तालुका पत्रकार समिती आणि जिल्हा पत्रकार संघाकडे असलेल्या नोंदणीकृत सदस्यांना मिळावी तसेच जे पत्रकार संघाचे सदस्य नसतील अशा पत्रकार बंधूंच्या बाबतीतही संबधित पत्रकार संघाच्या शिफारशी नुसार मदत मिळावी.
पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना विमा योजनेचे कवच दिले जाईल आणि त्याबाबतचा निर्णय पुढील कॅबिनेटमध्ये घेतला जाईल असे स्पष्ट केले होते. या गोष्टीलाही पंधरा दिवस झाले पण विम्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. तो तातडीने व्हावा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
माथेरानचे संतोष पवार किंवा पुण्याचे पांडुरंग रायकर यांचा मृत्यू त्यांना वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने झाला आहे. पुन्हा अशी वेळ कोणाही पत्रकारावर येऊ नये यासाठी पत्रकारांना अग्रक्रमाने बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध होईल अशी व्यवस्था व्हावी आणि त्यासंबंधीचा अध्यादेश लगेच काढला जावा.
पांडुरंग रायकर आणि संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि माहिती आणि जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिले होते. त्यानुसार पुणे आणि रायगडच्या सिव्हिल सर्जन यांना चौकशी करण्यास सांगण्यात आले होते. या चौकशीचे काय झाले ते समजले नाही. दोन्ही पत्रकारांच्या मृत्यूस जे जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे. वरील मागण्यांची सरकारकडून दखल घेतली न गेल्याने आपल्या वेदना व्यक्त करण्यासाठी राज्यातील पत्रकार प्रत्येक तालुक्यातील तहसिल समोर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत आहोत. तसेच आरोग्य मंत्र्यांकडे एसएमएस पाठवून आपल्या तीव्र भावना व्यक्त करीत आहोत. कोरोनामुळे अडचणीत आलेले माध्यम क्षेत्र आणि असंख्य पत्रकारांवर आलेली बेकारीची वेळ लक्षात घेऊन वरील सर्व मागण्यांची तातडीने पूर्तता करावी अशी मागणी मालवण पत्रकार समितीच्या वतीने करण्यात आली आहे.