भुईबावडा घाटातून वाहतूक सुरु.;अवजड वाहनाना ‘नो’ एन्ट्री

भुईबावडा घाटातून वाहतूक सुरु.;अवजड वाहनाना ‘नो’ एन्ट्री

वैभववाडी /-

अखेर भुईबावडा घाट आजपासून वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला आहे. परंतु घाटाची परिस्थिती लक्षात घेता अवजड वाहनांसाठी त्याठिकाणी प्रवेश नाकारण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली आहे.

भुईबावडा घाट रस्त्यात सुमारे १३० मीटर एवढी मोठी उभी भेग गेल्यामुळे हा घाटमार्ग वाहतूकीस बंद करण्यात आला होता. दरम्यान याठिकाणी पर्यायी मार्ग काढण्यात आला होता. या मार्गावरुन लहान वाहतूक देखील सुरू होती. मात्र चार ते पाच दिवसापूर्वी भुईबावडा घाटमार्गे अवजड वाहतूक सुरू होती. त्यामुळे याठिकाणी रस्ता खचण्याची शक्यता वर्तविली जात होती. दरम्यान प्रशासनाने खबरदारी म्हणून भुईबावडा घाटमार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद केला होता. मात्र अखंड कोकणवासियांचा सण गणेशचतुर्थी अवघ्या पंधरा दिवसांवर येवून ठेपली आहे. बहुतांशी मुंबईकर चाकरमानी भुईबावडा घाटमार्गे पसंती दर्शवितात. तरी गणेश चतुर्थीपूर्वी भुईबावडा घाट सुरू करावा अशी मागणी दशक्रोशीतील गणेशभक्त, प्रवासी व वाहनचालकांमधून केली जात होती. अखेर प्रशासाने गुरुवारी सायंकाळपासून भुईबावडा घाट रस्ता वाहतूकीस सुरू केला आहे.

मात्र या घाट मार्गातून अवजड वाहनाना ‘नो’ एन्ट्री आहे. तसेच या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित वाहन चालकांवर कारवाई होणार असल्याची माहिती वैभववाडी पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी दूरध्वनीवरून दिली. भुईबावडा घाटरस्ता सुरू झाल्यामुळे भुईबावडा दशक्रोशीतील गणेशभक्त, प्रवासी व वाहन चालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

अभिप्राय द्या..