बांदा /-

गत काही दिवसांपासून काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे प्रशासनाकडून अनलाॅक प्रक्रिया सुरू आहे. लांब पल्ल्याच्या एसटी बसफेऱ्या सुरू झाल्या तरी ग्रामीण भागातील मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांना बसची प्रतीक्षा कायम आहे. गणेशोत्सव खरेदीसाठी बांदा व सावंतवाडी बाजारपेठेत जाण्यासाठी ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे सावंतवाडी-मडुरा मार्गे सातोसे एसटी बस येत्या पंधरा दिवसांत सुरू करावी अन्यथा उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा, सावंतवाडी भाजप कार्यकारिणी सदस्य बाळू गावडे यांनी दिला आहे. काेराेना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळीत झाले हाेते. बसफेऱ्याही बंद करण्यात आल्या हाेत्या. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी हाेत आहे, तसेच मोठ्या प्रमाणात लसीकरणसुद्धा होत आहे. गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे खरेदीसाठी मोजके दिवस शिल्लक राहिले आहेत. एकीकडे कोरोनामुळे बेरोजगारी पत्करावी लागली असताना आता त्यात एसटी बससेवा बंद असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. हात दाखवा बस थांबवा अशी ओळख असलेली एसटी बस ग्रामीण भागातील जनतेची जीवनवाहिनी बनली आहे, याचा विचार प्रशासनाने करावा. शेर्ले, मडुरा, निगुडे, रोणापाल, पाडलोस, सातोसे आदी गावातील ग्रामस्थांना बाजाररहाट करण्यासाठी मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते. प्रवाशांची होणारी अडचण लक्षात घेत प्रशासनाने सावंतवाडी-मडुरामार्गे सातोसे एसटी तात्काळ सुरू करावी. येत्या पंधरा दिवसांत एसटी सुरू न केल्यास आम्हाला तीव्र लढा द्यावा लागेल, परिणामी कोणतीही कल्पना न देता आम्ही उपोषणास बसणार असल्याचा इशारा भाजप सावंतवाडी कार्यकारिणी सदस्य बाळू गावडे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page