सावंतवाडी /-
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना ५० लाखाची मदत द्या,तसेच या काळात योद्धा म्हणून काम करणाऱ्या इतर पत्रकारांना सुद्धा विमा कवच द्या,या मागणीसाठी आज सावंतवाडीत निदर्शने करण्यात आली.यावेळी तहसीलदार व प्रांताधिकारी यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक,जिल्हा पत्रकार संघाचे सचिव संतोष सावंत,सदस्य हरिश्चंद्र पवार,सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई,सचिव अमोल टेंबकर,खजिनदार रामचंद्र कुडाळकर,ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे,राजेश मोंडकर,प्रवीण मांजरेकर,संतोष परब,अनिल भिसे,सुधीर मल्हार,भूषण सावंत,शुभम धुरी,शैलेश मयेकर,सिद्धेश पुरलकर,निखिल माळकर,स्वप्नील नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री,नाईक म्हणाले, बुलढाणा येथील एका सभेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत देण्याचे जाहीर केले होते.मात्र पंधरा दिवस उलटूनही अद्याप त्यांना कोणतीही मदत प्राप्त झाली नाही.त्यामुळे त्यांना ही मदत तातडीने देण्यात यावी,तसेच इतर पत्रकारांनाही या मदतीचा लाभ व्हावा,या मागणीसाठी ३०० तालुक्यात ही निदर्शने करण्यात आली आहेत.तसेच तेथील तहसीलदार व प्रांताधिकारी यांना या मागणी संदर्भातील निवेदने देण्यात आली आहेत.दरम्यान या मागणीची शासनाने पूर्तता करावी,असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री.देसाई म्हणाले, कोरोना काळात पत्रकार आपल्या परिवाराचा विचार न करता योद्धा म्हणून काम करत आहेत.सर्वांचे आपल्या लेखणीतून प्रबोधन करत आहेत.मात्र अशा पत्रकारावर नेहमी शासनाचे दुर्लक्ष झाले आहेत.त्यामुळे कोरोना सारख्या संकटकाळात तरी शासनाने पत्रकारांच्या पाठीशी राहावे,असे त्यांनी सांगितले.