सिंधुदुर्ग /-
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागात वॉटर फिल्टर कुलर खरेदी प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत झाली आहे. मात्र ही समिती गठीत करण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी का लागला? या मागे गौडबंगाल काय ? उशिरा आदेश देवून जिल्हा परिषद प्रशासन हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप शिवसेना जिल्हा परिषद सदस्य गटनेते नागेंद्र परब यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच हा घोटाळा उघड केल्याशिवाय आपण गप्प बसणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेना जिल्हा परिषद सदस्य गटनेते नागेंद्र परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून जिल्हा परिषद शाळांना १००५ वॉटर फिल्टर कुलर खरेदी करण्यात आले होते. मात्र हे कुलर घेताना प्रत्यक्ष बाजार भावापेक्षा जास्त दराने खरेदी करण्यात आले आहेत. बाजार भाव १४ हजार ९९९ एवढा असतानाही ते १९ हजार ९०० रुपयांना खरेदी करण्यात आले आहे. यात एका वॉटर फिल्टर कुलर मागे सुमारे ५ हजार रुपये असा तब्बल ५० लाखांचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत आम्ही १४ जुलैच्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत शिवसेनेच्या वतीने आवाज उठविण्यात आला होता. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून येत्या पंधरा दिवसात अहवाल देण्यात येईल असे आश्वासित केले होते. असे असतानाही ही चौकशी समिती गठीत करण्यासाठी तब्बल १४ दिवसांचा कालावधी लागला. ही समिती स्थापन करण्यास येवढं विलंब का लागला ? या मागे नेमके गौडबंगाल काय ? असा प्रश्न उपस्थित करत जिल्हा परिषद प्रशासन हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नागेंद्र परब यांनी केला आहे.