सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांचा पुढाकाराने चिपळूण खेर्डी येथील पूरग्रस्तांना सिंधुदुर्गातून मदत..

सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांचा पुढाकाराने चिपळूण खेर्डी येथील पूरग्रस्तांना सिंधुदुर्गातून मदत..

खारेपाटण /-

कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने सर्वत्र पुरपरिस्थिती निर्माण झाली असून याचा सर्वाधिक फटका हा कोकणातील रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात पुराच्या पाण्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. तर अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांच्या पुढाकाराने चिपळूण खेर्डी येथील पूरग्रस्त बांधवांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथून जीवनावश्यक वस्तूंनी भरलेला टेम्पो प्रथमतः आज सायंकाळी खारेपाटण येथून चिपळूण येथे रवाना करण्यात आला.

खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक रफिक नाईक यांनी पुढाकार घेऊन खारेपाटण गावातील युवकांना एकत्र करून मदत रुपात जीवनावश्यक साहित्य गोळा केले. याकरीता संकेत शेट्ये मित्र मंडळ खारेपाटण, झुंझार मित्र मंडळ खारेपाटण, खारेपाटण बंदरगाव येथील नागरिक, खारेपाटण काझीवाडी येथील नागरिक तसेच खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल तळगावकर, महेश कोळसुलकर यांनी सहकार्य केले. तर मुबिन सारंग, रौफ पटेल, लियाकत काझी, गफार काझी, दैवत शेट्ये, कृष्णाजी नवरे, साई शेट्ये, प्रदीप निग्रे, सुकांत वरूनकर तसेच किरण, दीपक व अक्षय या खारेपाटण मधील युवकांनी सढळ हस्ते मदत केली.

तसेच मुंबई येथून सचिन बागवल, सतीश भोसले, झंहीद शेख झमील यांनी देखील या मदतीत आर्थिक हातभार लावला आहे. चिपळूण खेर्डी येथील पूरग्रस्त २५ नागरिकांना १५ दिवस पुरेल एवढे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू, किरणा माल तसेच १२ लिटर्सच्या पाण्याच्या बॉटलचे एकूण २०० बॉक्स आदी वस्तू पाठविण्यात आल्या. खारेपाटण येथील युवकांच्या या संकटकालीन सामाजिक मदतीच्या दातृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

अभिप्राय द्या..