पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांना पीक विमा उतरवण्यास १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळावी.;आमदार बाळा माने यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांना पीक विमा उतरवण्यास १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळावी.;आमदार बाळा माने यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

रत्नागिरी /-

पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत १५ जुलै ची मुदत २३ जुलैपर्यंत वाढविण्यात आली असली तरी कोकणसह राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांना पीक विमा उतरविण्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे पीक विमा मुदत १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत वाढवून मिळावी, यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव आणि कृषी सचिव यांच्याकडून तत्काळ प्रस्ताव घेऊन केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे शिफारस करावी, अशी मागणी रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी मंत्री नारायण राणे यांच्याकडे केली आहे.

माजी आमदार बाळा माने यांनी मंत्री राणे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, पंतप्रधान पीक विमा योजना २०२० पासून महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास पीक विमा योजनेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक संरक्षण दिले जाते. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेत सामावून घेणे आवश्यक आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार, शेतकरी आणि त्यांच्या संघटनांच्या मागणी मुळे १५ जुलै २०२१ ही मुदत २३ जुलैपर्यंत केंद्राने वाढवून दिली होती. परंतु त्यानंतर गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात, राज्यात अतिवृष्टीमुळे पूर स्थिती ओढवली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पुरेसा वेळ मिळालेला नाही, असे माने यांनी पत्रात म्हटले आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर स्थिती असून पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांना याचा फटका बदला आहे.त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ घेता आलेला नाही. या जिल्ह्यात वीज खंडित आहे. इंटरनेट सुविधा ठप्प आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होता यावे यासाठी पीक विमा योजनेकरिता अर्ज करण्यासाठी १५ ऑगस्ट पर्यंत मुदत वाढवून मिळावी म्हणून माजी आमदार बाळ माने यांनी मंत्री नारायण राणे यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे.

अभिप्राय द्या..