केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांचे खास. राऊत यांना आश्वासन

कुडाळ

चिपी विमानतळ कधी सुरु होणार हा प्रश्न जिल्हावासीयांसमोरील एक गहन प्रश्न बनला आहे. याविषयी आता खास. विनायक राऊत यांनी एक महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. चिपी विमानतळ सुरू होण्याबाबत येत्या आठ ते दहा दिवसात रिझल्ट देतो, असे आश्वासन केंद्रिय हवाई वाहतूक मंत्री ज्योतीरादित्य सिंदिया यांनी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार विनायक राऊत यांना दिले असल्याची माहिती शिवसेना जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.

याविषयी बोलताना नागेंद्र परब म्हणाले, शुक्रवार दि. ९ जुलै, २०२१ रोजी खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळाच्या कामाची पहाणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांच्या असे निदर्शनास आले की, विमानतळ सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कामे पुर्ण झाली असून त्यात कोणत्याही त्रुटी शिल्लक राहिलेल्या नाहीत. तसेच २८ जून, २०२१ रोजी आय. आर. बी. कंपनीने नागरी हवाई वाहतूक संचलनालयाला त्या संदर्भातील ॲक्शन टेकन रिपोर्ट सबमिट करुन 4C VFR ऐरोड्रोम लायसन्स मिळण्यासाठी विनंती केली आहे. त्यामुळे विमानतळ संपूर्णपणे पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर तो सुरु करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानगीला चालना देणे गरजेचे होते. त्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी दि. १३ जुलै, २०२१ रोजी दिल्ली येथे नागरी हवाई वाहतुक मंत्री ज्योतीरादित्य सिंदिया यांची भेट घेतली. त्यांना चिपी विमानतळाची नागरी हवाई वाहतूक संचलनालय (DGCA) मार्फत पाहणी होवून लवकरात लवकर चिपी विमानतळ सुरु करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी विनंती केली आहे. यावेळी केंद्रिय नागरी हवाई वाहतूक मंत्री सिंदिया यांनी याबाबत आपण विशेष लक्ष घालून ८ ते १० दिवसांत आपणांस रिझल्ट देतो, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे चिपी विमानतळावरुन लवकरच विमानसेवा सुरु होईल, असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला आहे. अशी माहिती शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page