पाचकुडे कुटुंबियांना शिवसेनेने दिला मायेचा हात…

वैभववाडी/-

माझा शिवसैनिक जगला तरच माझा शिवसेना पक्ष जगेल… 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण हा शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेबांनी तहहयात जपलेला मूलमंत्र… स्वर्गीय बाळासाहेबांच्याच या मूलमंत्रावर चालत आज सिंधुदुर्गच्या शिवसेना संघटनेने कट्टर शिवसैनिक असलेल्या दिवंगत दीपक पाचकूडे यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार दिला.

वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. 2 चे उपसरपंच आणि स्वर्गीय बाळासाहेबांचा भगव्या रक्ताचा कट्टर शिवसैनिक असलेल्या दीपक पाचकूडे यांचे मागील जून महिन्यात दुर्दैवी निधन झाले. शिवसेनेच्या विद्यमान जि. प. सदस्या दिव्या पाचकूडे पूर्वाश्रमीच्या पल्लवी झिमाळ यांचे दिवंगत दीपक हे पती. एक वर्षापूर्वीच विधात्याने हिरावलेलं सासू सासऱ्यांचं छत्र, त्यातून अजून सावरलं नसताना शिवसेनेच्या जि. प. सदस्य पल्लवी झिमाळ उर्फ दिव्या पाचकूडे यांच्याशी काळाने खुप वाईट डाव खेळला. त्यांचे पती आणि स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबाना आपले दैवत मानणारे दिपक पाचकुडे यांचं ऐन तारुण्यात निधन झालं आणि दिव्या पाचकुडे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. सासू सासऱ्यांच्या छत्रछायेनंतर कपाळाचं कुंकू आणि कुटुंबाचा एकमेव आधार हिरावला गेल्यानं दिव्या पाचकुडे आणि त्यांच्या दिड आणि तीन वर्षांच्या दोन मुलांसमोर भविष्याबद्दल मोठा प्रश्न उभा राहिला होता. कमावती एकमेव व्यक्तीच काळाने हिरावून नेल्यामुळे दोन चिमुरड्या मुलांचे भविष्य कसे घडवायचे ? आणि पुढे करायचे काय ? हा गहन प्रश्न पल्लवी झिमाळ यांच्यासमोर होता. पाचकूडे कुटुंबियांना या संकटकाळात शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी साथ दिली. स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण या तत्त्वानुसार चालणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाचकुडे कुटुंबियाला भेटून त्यांचे सांत्वन केले होते. खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी लोरे येथे पाचकूडे यांच्या घरी जात पाचकुडे कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना संघटना कायमस्वरुपी उभी राहिल, असा शब्द दिला होता. जिल्ह्यातील शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आम. दिपक केसरकर, आम. वैभव नाईक, यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने पाचकूडे कुटुंबियांना आर्थिक आधार देण्यासाठी पुढाकार घेतला. मंगळवार 6 जुलै रोजी शिवसेनेच्या माध्यमातून ५ लाख ३० हजार रुपयांचे फिक्स डिपॉझिट दिवंगत दीपक यांच्या कुटुंबियांच्या आधारासाठी ठेवण्यात आले.

कोरोनात अनेक जणांचे संसार उध्वस्त झाले. कोरोना अनेकांना पोरकं करून गेला. या परिस्थितीत शिवसेनेच्या माध्यमातून अनेकांना जगण्याचा आधार मिळाला. ‘माझा तळागाळातला शिवसैनिक जगला, तर शिवसेना जगेल’, हे बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य. यानुसारच शिवसेना आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहते. दिव्या पाचकुडेंना आर्थिक आधार देत शिवसेनेनं आपलं ब्रीद पुन्हा पाळलं आहे. सर्व जि. प. सदस्यांनी एकत्र येत पाचकुडे कुटुंबियांच्या भविष्य निर्वाहासाठी 2 लाख 30 हजारांचा निधी जमवला. तर शिवसेना पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत ३ लाख रुपये गोळा करण्यात आले. अशाप्रकारे एकूण ५ लाख ३० हजाराचा निधी फिक्स डिपॉझिट करून पाचकुडे कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली. कुटुंबाचा आधार काळाने हिरावून नेला, तरी तुम्ही पोरक्या झालेल्या नाहीत. शिवसेनेच्या रुपात सारी पक्षसंघटना आपलं कुटुंब आहे. आणि शिवसेनेचे हे कुटंब कायम आपल्या पाठीशी आहे, हा विश्वास शिवसेनेच्या या कामामुळे पाचकुडे कुटुंबियांना मिळाला आहे. यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, जि. प. गटनेता नागेंद्र परब, तालुकाप्रमुख मंगेश लोके, शहर प्रमुख प्रदिप रावराणे, जि. प. सदस्य संजय आग्रे, अमरसेन सावंत, हरी खोबरेकर, शिवसेना विभागप्रमुख राजू रावराणे, जि. प. सदस्य स्वरुपा विखाळे तसेच शिवसेनेच्या अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाचकुडे कुटुंबियाला भेटून त्यांचे सांत्वन केले आणि शिवसेना पक्ष संघटना कायमच आपल्यासोबत असेल, असा विश्वास दिला.

अभिप्राय द्या..