अभिनव समाजोपयोगी उपक्रमाचे होत आहे समाजाच्या विविध स्तरातून कौतुक
सिंधुदुर्गनगरी /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळ नुकतेच येऊन गेले. जिल्हावासीय विशेषत: किनारपट्टीय परिसरातील नागरिकांचे त्यामुळे प्रचंड नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने ग्रामीण कुटा या संस्थेच्या व्यवस्थापनाने नुकसानग्रस्तांना दैनंदिन प्रपंचाच्या वस्तू वितरीत करुन समाजकार्य केले आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल समाजाच्या विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात धडकलेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. कित्येकांचे संसार उघड्यावर आले तर अनेक कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना मदत व्हावी उद्देशाने क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड अर्थात सर्वसामान्यांना परिचित असणाऱ्या ग्रामीण कुटा या संस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करण्यात आले. जिल्ह्यातील किनारपट्टी भागात मालवण वेंगुर्ला या तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना मदतीचा हात देण्यात आला. मालवण तालुक्यातील मेढा, देवबाग, तारकर्ली, निवती वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा, शिरोडा आदी विविध गावांमध्ये संसारोपयोगी वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले. नुकसानग्रस्त नागरिकांना फक्त शाब्दिक आधार देण्यापेक्षा त्यांना दैनंदिन आवश्यक वस्तू देऊन सहकार्य केले. त्यांच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांनी ग्रामीण कुटाचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. शासनाने दिलेले कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करीत हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या अभिनव उपक्रम यशस्वी करण्यासाठी एरिया मॅनेजर रवीकुमार सूर्यवंशी, ब्रँच मॅनेजर विजय क्षिरसागर, मारुती बणे, राहुल चव्हाण, केंद्र मॅनेजर प्रथमेश घाडी, चिन्मय अमरे, अनिल कांबळे, शुभम पवार, लक्ष्मण गावडे, केंद्र मॅनेजर दशरथ कोकिटकर, चैताली बागायतकर आदी उपस्थित होते.