मालवण/-
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेविरोधात गेली तीन महिने सातत्याने मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आवाज उठवला होता. रुग्णालयासमोर केलेल्या आंदोलनात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मनमानी कारभाराची पोलखोल केली होती. त्यामुळेच रविवारपासून जिल्हा रुग्णालयात कोव्हीड-१९ उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या आहारामध्ये जेवणात अंडी व केळ्यांचा समावेश करण्यात आला आहे. योग्य प्रतीचे जेवण देण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
पिण्याच्या गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मृत रुग्णांचे वाहनाअभावी होणारी परवड पाहिली जात नव्हती. याबाबत मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी सातत्याने पत्रव्यवहार केला होता. आता भाडेतत्त्वावर शववाहिनी उपलब्ध केली केली जाणार आहे. आरोग्य यंत्रणेने जाहीर केलेले निविदांचे दर व प्रत्यक्ष खरेदी केलेले साधनसामग्रीचे दर यात तफावत आहे. त्याची दखल मनसेने केलेल्या आंदोलनामुळेच पालकमत्र्यांना घ्यावी लागल्याची माहिती मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी दिली.
हे सर्व श्रेय मनसेचेच आहे.येत्या २४ सप्टेंबर रोजी आरोग्य उपसंचालक आरोग्य यंत्रणेसंबधी असलेल्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मनसेने केलेल्या आंदोलनाच्या पाश्वभुमीवर जिल्ह्यात येत आहेत. मनसे शिष्टमंडळ सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली चर्चा करणार आहे असे असले तरी यापुढेही मनसे अपुऱ्या सेवेबाबत आवाज उठवणार आहे. प्रसंगी जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरून काम करणार आहे असेही श्री. इब्रामपूरकर यांनी स्पष्ट केले आहे.