कणकवली /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या तौक्ती चक्रीवादळामुळे सगळीकडे हाहाकार माजवला. यात अनेकांचे संसार घरे पडून उघड्यावर आले. बागायतदारांचे काढणीला आलेले पिक गळून मातीमोल झाले. तसेच २०१९ मध्ये पडलेल्या अतिपावसामुळे कणकवली तालुक्यातील २२ घरे पुर्णतः बाधित झालेली आहेत.
तसेच संपूर्ण जिल्ह्यातील सुमारे २८३ घरांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे या पुरामुळे व पावसामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना प्रधानमंत्री आवासा योजना-ग्रामीण अंतर्गत घरकुलांचा लाभ मिळवून द्यावा, अशी विनंती कणकवली पं. स. सभापती मनोज रावराणे यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तौक्ती वादळाने सिंधुदुर्गात केलेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर हे काल दि. २० मे रोजी जिल्ह्यात दाखल झाले. त्यावेळी कणकवली तालुक्यातील नुकसानीचा आढावा कणकवली पं. स. सभापती मनोज रावराणे यांनी फडणवीस यांच्यासमोर मांडला. तौक्ती चक्रीवादळामुळे जिल्ह्याचे भयंकर नुकसान झाले आहे. तसेच २०१९ मध्ये झालेला अतिपाऊस आणि त्यामुळे आलेला पुर यामुळे अनेकजण बेघर झाले. यात सिंधुदुर्ग जिल्हातील देवगड 17, दोडामार्ग 43, कणकवली 22, कुडाळ 55, मालवण 43, सावंतवाडी 24, वेंगुर्ला 79 मिळून एकुण 283 घरांचे प्रस्ताव मंजूरीसाठी केंद्र सरकारकडे सादर करण्यात आले होते. हे प्रस्ताव अजून प्रलंबित असून सदर प्रस्तावांना केंद्र शासनाकडून मंजूरी मिळवून नुकसानग्रस्तांना घरकुल मिळवून द्यावे, अशी मागणी मनोज रावराणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रपत्र “ड” यादी अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हातील 36,729 घरांचे आवास प्लसमध्ये सर्व्हेक्षण झालेले असून त्यामधील कणकवली तालुक्यातील 4,368 घरकुले मंजूरीसाठी प्रतिक्षेत आहेत. चार दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात आलेल्या चक्रीवादळामुळे सुमारे 5,000 घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही नुकसान झालेली बहुसंख्य घरे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रपत्र “ड” यादी मधील आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रपत्र “ड” यादी मंजूर करावी, अशी विनंती कणकवली पं. स. सभापती मनोज रावराणे यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रा फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, पं. स. कणकवलीचे सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर आदी उपस्थित होते.