कुडाळ /-

सुरुवातीच्या काळात लसींचा पुरवठा कमी असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय लसीचे वाटप करण्यात येत होते. मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून लसींचा पुरवठा वाढल्यामुळे आता प्राथमिक आरोग्य केंद्रांबरोबरच उपकेंद्रांमध्ये देखील लसीकरण कार्यक्रम करण्याचे नियोजन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने केले आहे. त्याचे स्वागत करतानाच जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संजना सावंत, उपाध्यक्ष श्री.राजेंद्र म्हापसेकर सर्व सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिफे यांनी योग्य समन्वय साधून जिल्ह्याच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत लसीकरण मोहीम नेल्याबद्दल जिल्हा परिषदेमधील गटनेते रणजित देसाई यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

खरंतर ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी आमची नाही असे सांगत जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी आपली जबाबदारी या अगोदरच झटकली होती. मात्र सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व अधिकारी यांनी ही जबाबदारी स्वीकारत जिल्ह्याच्या प्रत्येक उपकेंद्रा पर्यंत टप्प्याटप्प्याने लसीकरणाचा कार्यक्रम पोहोचवण्याचा आराखडा तयार केला. त्याप्रमाणेच दोन दिवसापासून उपकेंद्र निहाय देखील लसीकरण मोहीम सुरु करण्यात आलेली आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही किंवा तासंतास वाट देखील पाहावी लागणार नाही. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत देखील केले जात आहे. आता या लसीकरणाचे श्रेय घेण्याचा काही सत्ताधारी पुढारी केविलवाणा प्रयत्न करत आहेत. लसीकरण सुरू झालेल्या उपकेंद्रांना भेट देऊन आपल्याच प्रयत्नातून हे लसीकरण सुरू झाल्याचे भासवत आहेत. मात्र त्यांच्याच पक्षाच्या पालकमंत्र्यांनी या लसीकरणाची जबाबदारी आमची नाही असे धक्कादायक विधान केले होते.

कोरोनाच्या सुरूवातीच्या काळापासूनच जिल्हा परिषदेचे सर्वच विभाग जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत व अन्य विभागांचा फार मोठा सहभाग आहे. यापुढे देखील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्पेशल टास्क फोर्स स्थापन करून त्या माध्यमातून प्रत्येक गावागावातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे अशी माहिती गटनेते रणजित देसाई यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page