नगरपंचायत सेंटरला स्वतंत्र परवानगी देण्याची केली आहे मागणी..
कणकवली /-
: नगरपंचायतच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पर्यटन सुविधा केंद्रातील कोविड केअर सेंटरला कालच दिलेली परवानगी ही हरकुळ बुद्रुक येथील कोविड केअर सेंटरला संलग्न करून दिलेली आहे. मात्र अशी संलग्न परवानगी दिल्यानंतर नगरपंचायतीच्या कोवि केअर सेंटरसाठी स्वतंत्र डॉक्टर व नर्स चा आवश्यक स्टाफ दिलेला नाही. व संलग्न असल्याने तसा स्टाफ देता येत नसल्याचे सांगण्यात आले. एकीकडे परवानगी दिल्याचे दाखवले जात असले तरी त्या परवानगीच्या आधारे डॉक्टर व नर्सेस दिली पाहिजेत. पण ती देत नसल्यामुळे ती दिलेली संलग्न परवानगी आम्ही नाकारल्याची माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. एकीकडे परवानगी दिल्याचे सांगण्यात येते पण डॉक्टर, नर्सेस देत नाहीत अशा संभ्रमाच्या स्थितीत परवानगी दिल्याने या कोविड सेंटर मध्ये दाखल झालेल्या रुग्णांवर उपचार करणार कोण? असा सवाल नलावडे यांनी केला. त्यामुळे संलग्न शब्द प्रयोग करत दिलेली परवानगी संभ्रमित असून, कणकवली नगरपंचायतने स्वतःचे कोविड केअर सेंटर केलेले असल्याने त्यासाठी स्वतंत्र परवानगी व स्वतंत्र डॉक्टर, नर्सेस देण्याची मागणी प्रांताधिकारी व आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. आमदार वैभव नाईक यांनी कणकवली नगरपंचायत कोविड केअर सेंटरला जी परवानगी दिल्याची माहिती दिली, ती परवानगी नगरपंचायतच्या कोविड केअर सेंटरला स्वतंत्र नसून, हरकुळ बुद्रुक येथील कोविड केअर सेंटरला संलग्न अशी दिलेली आहे. त्याची प्रतही नगरपंचायत कडे उपलब्ध आहे. त्यामुळे आमची सुरुवातीपासूनच मागणी आहे की, परवानगी देताना नगरपंचायत ने केलेल्या शहरातील कोविड रुग्णांसाठीच्या कोविड केअर सेंटरला स्वतंत्र परवानगी देत त्या कोविड केअर सेंटर साठी आवश्यक असलेला डॉक्टर व नर्सेस चा स्टाफ देण्यात यावा असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.