वेंगुर्ले /-
शिवकालीन ऐतिहासिक वारसा संवर्धनाची भावना आणि सामाजिक बांधिलकी जपत नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता व श्रमदान उपक्रम अंतर्गत वेंगुर्ला रेडी येथील ऐतिहासिक यशवंत गडाची श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली.वेताळ प्रतिष्ठान नेहमीच आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून समाजहिताचे कार्य करत असते. यावेळी नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता व श्रमदान उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रम अंतर्गत रेडी येथील शिवकालीन ऐतिहासिक वारसा असलेल्या यशवंत गडाची स्वच्छता करण्यात आली. पर्यटनाच्या दृष्टीने यशवंत गड येथे पर्यटक येत असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने स्थळाची सुस्थिती अबाधित राहणे आणि ऐतिहासिक वारसा संवर्धन करीता हा उपक्रम राबविण्यात आला. गड सुसज्ज राहण्यासाठी स्थानिक शिवप्रेमी सातत्याने संवर्धनाकरिता प्रयत्नशील असून त्यामध्ये प्रतिष्ठान दरवर्षी आपला सहभाग दर्शवत असते.सदर स्वच्छता मोहिमेत वेताळ प्रतिष्ठानच्या ७० हुन अधिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेत गड परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्ग चे पदाधिकारीही उपस्थित होते.