नवी दिल्ली :रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर आहे. मेल-एक्सप्रेसमधील प्रतीक्षा यादीमुळे (वेटिंग लिस्ट) होणारी धाकधूक आता कायमची मिटणार आहे. कारण मेल-एक्सप्रेस गाड्यांमधील वेटिंग लिस्ट कायमची हद्दपार करण्यासाठी रेल्वे विभागाकडून एका विशेष योजनेवर काम केले जात आहे. २०२४ पर्यंत ही योजना प्रत्यक्षात आणली जाणार आहे. ज्यामुळे मेल-एक्सप्रेस गाड्यांमधील वेटिंग लिस्टची प्रक्रिया रद्द होणार आहे.
प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे चालवण्याचा  विचार रेल्वे विभाग करत आहे. त्यानुसार २०२४ पर्यंत वेटिंग लिस्ट रद्द  करण्याबाबत उपाययोजना रेल्वेकडून केली जात आहे. रेल्वेने ‘व्हिजन २०२४’ निर्धारीत केले आहे. ज्यात रेल्वेचे नुकसान कमी करून महसूल वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे चालवल्यास पूर्ण क्षमेतेने सेवा दिली जाईल. ज्यामुळे पूर्ण उत्पन्न मिळेल. तसेच प्रवाशांची प्रतीक्षा यादी संपुष्टात येईल. ‘मागणीनुसार रेल्वे’ या गाड्यांचे कशा प्रकारे नियोजन करायचे, याचा सध्या रेल्वे बोर्डाकडून विचार सुरु आहे. २०२४ पर्यंत वेटिंग लिस्टची कटकट कायम स्वरूपी रद्द होण्यासाठी रेलवे बोर्डाकडून विचार केला जात आहे. तसे झाल्यास प्रवाशांसाठी देखील हा मोठा दिलासादायक निर्णय ठरणार आहे. गणेशोत्सव, उन्हाळी सुट्टी, दिवाळी तसेच सणासुदीला गावी तसेच पर्यटनाला जाण्यासाठी प्रवाशांना चार-चार महिने आधी नियोजन करावे लागते. गाड्यांची तिकिटे आरक्षण खुले होताच काही क्षणात फुल्ल होत असल्याने अनेक जण आरक्षण खिडकीसमोर तास्न तास रांगेमध्ये काढतात. आता वेटिंग लिस्ट रद्द होणे आणि मागणीनुसार रेल्वे उपलब्ध करणे यासारखे निर्णय प्रवाशांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

रेल्वे व्हिजननुसार २०२४ पर्यंत माल वाहतूक २०२४ दशलक्ष टनापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. २०१९ मध्ये रेलवेकडून १२१० दशलक्ष टन मालाची वाहतूक करण्यात आली होती. गेल्या वर्षी देशात एकूण ४७०० दशलक्ष टन मालाची वाहतूक झाली. त्यात रेल्वेचा २७ टक्के हिस्सा होता. माल वाहतुकीतून रेल्वेला प्रचंड महसूल मिळतो. टाळेबंदीमध्ये रेलवेने मालाची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली. २०२६ पर्यंत देशातील एकूण माल वाहतूक ६४०० टनांपर्यंत पोहचेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रेल्वे व्हिजन २०२४ साठी २.९ लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के यादव यांनी सांगितले. नॅशनल रेल्वे योजनेबाबत गुंतवणूकदार आणि इतर घटकांशी चर्चा करू आणि निर्णय घेऊ असे यादव यांनी सांगितले. रेल्वेचा खर्च कमी करणे आणि माल वाहतुकीचा दर स्पर्धात्मक करणे याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल, असे यादव यांनी सांगितले. पुढील महिनाभरात या योजनेला मंजुरी दिली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

करोनामुळे उत्पन्नात मोठी घसरण
२०२४ पर्यंत रेल्वेच्या महत्वाच्या योजनांसाठी आवश्यक निधीची व्यवस्था करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात करोनामुळे रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद होती.त्यामुळे यंदा प्रवासी वाहतुकीतून मिळणारे उत्पन्नात मोठी घसरण होईल. यंदा प्रवासी वाहतुकीतून १५००० कोटींचा महसूल मिळेल. गेल्या वर्षी ५३००० कोटी मिळाले होते. आतापर्यंत प्रवासी वाहतुकीतून ४६०० कोटींचा महसूल मिळाला आहे. दरम्यान, प्रवासी वाहतुकीतून महसूल कमी होणार असला तरी माल वाहतुकीच्या उत्पन्नात १० टक्के वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page