कुडाळ /-
कोरोना सोबतच कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पसरत असलेली लेप्टोस्पायरोसिसची साथ व रूग्ण वाढत असल्याने या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी तालुक्यातील सर्व जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, यासाठी नागरिकांनी स्वतःची आरोग्य तपासणी न घाबरता करून घ्यावी तसेच साथ रोग पसरू नये यासाठी प्रत्येकाने नियमावलीचे पालन करावे. अन्यथा साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी कडक कारवाई करण्यात येतील अशी माहिती पत्रकार परिषदेत कुडाळचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बरोबरच कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात लेफ्टोचे रुग्ण आढळत असून याबाबत प्रशासनाच्यावतीने माहिती देण्याकरिता कुडाळ पंचायत समिती येथे मंगळवारी सांयकांळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती नुतन आहीर, उपसभापती जयभारत पालव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी विजय चव्हाण यांनी सांगितले की, तालुक्यात आतापर्यंत गेल्या सहा महिन्यात 93 लेफ्टोचे रुग्ण सापडले असून यामध्ये चार जणांचा लेफ्ट ने मृत्यू झाला आहे. सर्व रूग्णावर उपचार सुरू आहेत. लेफ्टोवर औषध असूनही तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत याचे प्रमुख कारण तापसरीचे रूग्ण तपासणी करीता येत नाही आहेत. प्रशासनाच्यावतीने लेफ्टोची साथ पसरू नये याकरिता योग्य ती उपाययोजना, योग्य ती तपासणी केली सुरू आहे, गोळ्या वाटप चालू आहेत. ग्रामपंचायत स्तरावर कोरोना प्रतिबंधात्मक कृती समितीच्या वतीने आता लेफ्टो साथ नियंत्रण करण्यासाठी सहकार्य घेण्यात येणार आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी, ताप आला तर घाबरून न जाता प्रत्येकाने आरोग्य तपासणी करावी. कोरोना, लेफ्टो, डेंग्यु, मलेरिया, माकडताप यासारख्या सर्व तपासण्या मोफत शासकीय रुग्णालयात केल्या जाणार आहेत. कोरोना कमी होत असताना आता कोरोनाची दुसरी लाट येत आहे त्याच बरोबर लेफ्टो चे रुग्ण वाढत असल्याने या साथ रोगापासून तालुक्यातील सुमारे 1 लाख 30 हजार जनतेची काळजी घेण्यासाठी प्रशासनाला सर्व जनतेने सहकार्य करावे, तापसरीच्या रूग्णानी घाबरून न जाता तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणे, सोशल डिस्टस्टींग न ठेवणे या व इतर नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच दुकानदारांनीही सोशल डिस्टंसिंगचे पालन दुकानावर करावे तसे न केल्यास दुकानदारावर व दुकानावर ही शासनाच्या कडून कारवाई करण्यात येईल व या बाबतच्या नोटीसा दुकानदारांना पाठविण्यात येतील अशी माहिती चव्हाण यांनी दिली . यावेळी डाॅ संदेश कांबळे यांनी सांगितले की, तालुक्यातील कसाल, हिर्लोक, हुमरमळा- वालावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रत्येकी पाच गावात तर कडावल प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन गावात लेफ्टो चे रूग्ण मोठ्या संख्येने आहेत. तर जांभवडे व भुतवड गावात मोठ्या प्रमाणात रूग्ण आहेत. साथ आटोक्यात आणण्यासाठी योग्य ती प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. शासकीय बरोबरच खाजगी डॉक्टरांची ही मदत घेण्यात येत आहे.