समतादूत ,बार्टी भंडारी हायस्कूलमध्ये संविधान दिन साजरा…
मालवण /-
संविधानाने भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यांची शिकवण दिली आहे. संविधानातील या मूल्यांमुळेच संपूर्ण भारत देश जगाला एकतेचा संदेश देत आहे. संविधानाने देशातील नागरिकांमध्ये भारतीयत्वाची जाणीव निर्माण केली आहे, असे प्रतिपादन संग्राम कासले यांनी येथे बोलताना केले.
बार्टी समतादूत प्रकल्प व भंडारी ए.सो. हायस्कूल मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारी हायस्कुलमध्ये संविधान दिनाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी बार्टीचे संग्राम कासले हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक व्ही. जी. खोत, पर्यवेक्षक हणमंत तिवले, शिक्षिका संजना सारंग आदी उपस्थित होते. यावेळी भंडारी हायस्कुलतर्फे मुख्याध्यापक खोत यांच्या हस्ते संग्राम कासले यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी श्री. माने यांनी उपस्थिती दर्शवित शुभेच्छा दिल्या. यावेळी संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी संग्राम कासले म्हणाले, आपण प्रथम भारतीय आहोत ही संविधानाने दिलेली मुख्य शिकवण आहे. भारतातील बहु धर्मीय, जातीय लोकांना संविधानाने एकत्रित बांधून ठेवले आहे. म्हणूनच सर्व धर्मीय जातीचे लोक एकत्र नांदत आहेत. प्रत्येकाने संविधान निर्मितीची प्रक्रिया प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक आहे. संविधान निर्मिती मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान मोठे आहे. म्हणूनच संविधानाचा अभ्यास करून जनजागृती करणे आवश्यक आहे. घटनाकारांचे योगदान सांगणे गरजेचे आहे. संविधान हीच जगण्याची जीवनपद्धती आहे. भारताचे संविधान ही जगातील सर्वोत्तम व आदर्शवत राज्यघटना आहे, असेही संग्राम कासले म्हणाले.
यावेळी मुख्याध्यापक खोत यांनीही मार्गदर्शन केले. सर्वाना संविधानाचे महत्व कळले पाहिजे. संविधानाने नागरिकांना हक्काची जाणीव करून दिली. संविधानाने सूत्रबद्ध पद्धतीने देशाला बांधले आहे. घराघरात संविधानाची प्रत असली पाहिजे, असे खोत यांनी सांगितले. प्रास्ताविक शिक्षक आर. डी. बनसोडे यांनी तर आभार खोत यांनी मानले. कोरोना महामारी पार्श्वभूमीवर अल्प विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत मास्क लावून व सोशल डिस्टनसिंग पाळून हा कार्यक्रम पार पडला.