कुडाळ /-
कुडाळ शहरातील अनधिकृत बांधकामावरील कारवाई तुर्तास स्थगित करण्यात आली असल्याची माहिती कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी दिली. कोरोना महामारीत कुडाळ शहरातील अनधिकृत बांधकामे हटविण्याची तयारी नगरपंचायतीने केली होती. शिवसेनेचे कुडाळ तालुका अध्यक्ष राजन नाईक आणि माजी तालुकाध्यक्ष संतोष शिरसाट तसेच भाजपाचे तालुकाध्यक्ष विनायक राणे, शहर अध्यक्ष राकेश कांदे अन्य नगरसेवक यांनी ही मोहीम तूर्त स्थगित ठेवावी अशी मागणी नगर पंचायतीकडे केली होती. मात्र त्यानंतर नगरपंचायत प्रशासन आणि नगराध्यक्ष ओंकार तेली यांची नेमकी भूमिका काय याकडे लक्ष लागून राहिले होते. याबाबत आज नगराध्यक्षांनी अधिकृत पत्र काढून सद्यस्थितीत कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसामुळे सदर कारवाई तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष ओमकार तेली आणि मुख्याधिकारी नितीन गाढवे यांनी सांगितले.