✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी.
बँकेच्या स्ट्रॉंग रूममधील रिममध्ये चक्क मुलांच्या खेळण्यातील ५०० रुपये दराच्या ३२३ नोटा ठेवून बँकेची तब्बल १ लाख ६१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नोव्हेंबर २०२२ ते ८ जून २०२३ रोजी सायंकाळी ४.३० वा कालावधीत घडली आहे. या प्रकरणातील संशयित हा बँकेचाच कर्मचारी असल्याचे पुढे आले आहे.
अक्षय चंद्रकांत वेशवीर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. शाखा रत्नागिरीमधील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.त्यानुसार, संशयित बँकेचा रोखपाल अक्षय वेशवीकर याने सात महिन्यांच्या कालावधीत डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. शाखा रत्नागिरी (डी.एन.एस.) येथील कॅश काउंटरमधील ५०० रुपयांच्या प्रत्येकी १०० नोटांच्या ४ बंडलांमध्ये तसेच अशी १० बंडल असलेल्या स्ट्रॉंग रुममधील रिममध्ये अशा एकूण १४ बंडलांमध्ये ५०० रुपये दराच्या ३२३ लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा ठेवून बँकेची १ लाख ६१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी अक्षय विरोधात भा. दं. वि. कायदा कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल आहे. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
